लष्करी पातळीवरील चर्चेदरम्यान सैन्यमाघारीचा निर्णय सहमतीने होऊनही त्याच्या अंमलबजावणीत चालढकल करणाऱ्या चीनला आज भारताने जोरदार झटका दिला. पूर्व लडाखमधील पँगाँग फिंगर चारच्या उत्तरेकडील आणि फिंगर पाचच्या पर्वतीय प्रदेशातील महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय जवान आक्रमक झाले आहेत. जून महिन्यात चीनबरोबर संघर्ष सुरु झाल्यानंतर प्रथमच भारताच्या लष्कराने आणि विशेष सीमा दलाने वेगवान मोहिम राबवित दबाव निर्माण केला आहे.
‘‘भारतीय सैन्य चीनच्या सीमेवर दाखल झाले नसले तरी मोक्याची ठिकाणांवर आक्रमकता दाखविण्यात आलेली आहे. या भागात आपली बाजू अधिक बळकट केली आहे,’’ अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. चीनबरोबर तणाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी ही कामगिरी केली आहे.
चिनी सैन्याने काल (ता. १) भारताच्या चुमार भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न दक्ष असलेल्या भारतीय जवानांनी साफ उधळून लावला. त्यांचा हा अशा प्रकारचा तिसरा प्रयत्न होता. लडाखमधील पँगाँग त्सो या जलाशयाच्या परिसरात चीनने ३१ ऑगस्ट रोजी केलेल्या आक्रमक हालचालींना भारतीय जवानांनी वेळीच रोखल्यानंतर चीनकडून त्याबाबत कांगावखोरपणा करण्यात आला आणि भारताकडून यथास्थिती, शांतता व स्थिरतेचा भंग केला जात असल्याचा आरोप केला. भारताने त्यास प्रत्युत्तर देताना चीनने त्यांच्या सैन्याला संयम बाळगण्यास सांगावे असे सुनावले आहे. आज पुन्हा उभय देशांच्या ब्रिगेडियर स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चुशुल येथे बैठक सुरु झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात टिप्पणी करताना उभय देशांचे परराष्ट्र मंत्री, विशेष प्रतिनिधी यांच्या पातळीवरील बोलण्यांमध्ये सहमत झालेल्या मुद्यांचा चीनतर्फे भंग करण्यात आला आहे असे म्हटले. मुख्यतः यथास्थितीचे पालन, शांतता व स्थिरता राखण्याबाबत या बोलण्यांमध्ये सहमती झालेली होती. परंतु चिनी सैन्याच्या आक्रमक हालचालींमुळे त्याचा भंग झाला आहे. चीनने त्यांच्या सीमेवर तैनात सैन्यास संयमाने राहण्याचा सल्ला द्यावा असे आवाहनही भारताने चीनला केले. परंतु दिल्लीतील चिनी वकिलातीतर्फे प्रत्युत्तर देताना भारतावरच आक्रमकतेचा आरोप लावण्यात आला.
तिबेटी जवानाचा मृत्यू?
गेल्या शनिवारी (ता. २९) भारत व चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या विशेष दलात कार्यरत असलेला एक तिबेटी जवान हुतात्मा झाल्याचा दावा तिबेटच्या विजनवासातील संसदेच्या सदस्या नामग्याल डोलकर लाग्घारी यांनी केला असल्याचे वृत्त काही विदेशी माध्यमांनी दिले आहे. हा जवान मूळचा तिबेटचा होता, असे लाग्घारी यांनी म्हटले असून याच घटनेत तिबेटचा आणखी एक जवान जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुईंग यांनी मात्र हा दावा आज फेटाळला. भारतीय सीमेवरील नव्या संघर्षात भारताच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सैन्याची जमवाजमव
भारताने पूर्व सीमेवरील व मुख्यतः अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील सैन्यात वाढ केलेली आहे. दोन्ही देशांनी संघर्षाची शक्यता नाकारलेली असली तरी सावधानता म्हणून साधनसामग्रीची जमवाजमव करण्यात आली आहे.
संपादन: ओंकार जोशी