मित्र देशांना भारत करणार कोरोना लसींचा पुरवठा    

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

कोरोनाची महामारी सुरु झाल्यानंतर या विषाणूवर कोणतेच औषध नसताना तात्पुरता उपाय म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करण्यात आला होता. व या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा देखील भारताने जगभरात सर्व मित्र देशांच्या विनंतीवरून केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत कोरोना विरुद्धची लस इतर देशांना पुरवणार आहे.

भारताने कोरोनाच्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम मागील शनिवार पासून सुरु केली. या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सीरम इन्स्टिटयूटने उत्पादित केलेल्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींपासून ही मोहीम सुरू केली. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 6,31,417 जणांना कोरोना विरुद्धची लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने आज जाहीर केली आहे. व त्यासाठी 3,800 सत्रे घेण्यात आल्याचे स्वास्थ्य मंत्रालयाने आज सांगितले. त्यानंतर आता भारताचे शेजारील आणि मित्र देश यांनी कोरोना विरुद्धची भारतीय निर्मित लस पुरवण्याची विनंती केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 तारखेला कोरोना साथीच्या विरूद्ध लसीकरण मोहिमेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उदघाटन केले. या मोहिमेत कोरोना विरुद्धच्या लढ्यातील आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. यानंतर आता भारत सरकारला शेजारच्या आणि मुख्य भागीदार देशांकडून भारतीय निर्मित लस पुरवण्याच्या अनेक विनंत्या प्राप्त झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशल्स, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांकडून कोरोनाची लस पुरवण्याची मागणी करण्यात आल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने सांगितले. व यातील भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्स या देशांना 20 जानेवारी म्हणजे उद्यापासून सहाय्यता पुरवठा करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांना लसीचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक नियामक मंजुरींची प्रतीक्षा असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोनाची महामारी सुरु झाल्यानंतर या विषाणूवर कोणतेच औषध नसताना तात्पुरता उपाय म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करण्यात आला होता. व या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा देखील भारताने जगभरात सर्व मित्र देशांच्या विनंतीवरून केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत कोरोना विरुद्धची लस इतर देशांना पुरवणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोविशील्ड ही लस अ‍ॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आहे. तर कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी एकत्रित मिळून बनवलेली आहे.  

संबंधित बातम्या