भारतीय लष्कराकडून खांद्यावरून हवेत माराकरणारी क्षेपणास्त्रे तैनात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

भारतीय जवानांकडे रशियन बनाटीची ‘इग्ला एअर डिफेन्स सिस्टिम’ देण्यात आली आहे. भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा खोडसाळपणा करणाऱ्या शत्रू राष्ट्रांच्या विमानांना धडा शिकवण्याचे काम आपले जवान करतील असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये चीनकडून वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतानेही सीमेवरील लष्करी बळ आणखी वाढवायला सुरुवात केली आहे. येथील पर्वत रांगांमध्ये रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणांवर खांद्यावरून हवेत क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असणाऱ्या तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे. 

भारतीय जवानांकडे रशियन बनाटीची ‘इग्ला एअर डिफेन्स सिस्टिम’ देण्यात आली आहे. भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा खोडसाळपणा करणाऱ्या शत्रू राष्ट्रांच्या विमानांना धडा शिकवण्याचे काम आपले जवान करतील असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  विशेष म्हणजे भारताचे लष्कर आणि नौदल या दोघांकडून  या रशियन क्षेपणास्त्र प्रणालीचा आधीपासूनच वापर करण्यात येतो. आणीबाणीच्या प्रसंगी शत्रू राष्ट्राचे हेलिकॉप्टर अथवा विमान आपल्या हद्दीत आले तर त्याला  या माध्यमातून टिपता येते.

चीनच्या आकाशातील हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी भारताने रडार यंत्रणा आणि हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचा आधार घ्यायला सुरवात केली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोरे आणि टेहळणी चौकी क्रः १४च्या हद्दीमध्ये चिनी लष्कराची हेलिकॉप्टरे सातत्याने घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय हवाई दलाने या भागामध्ये ‘सुखोई-३० एमकेआय’ ही विमान मेच्या पहिल्या आठवड्यातच या भागांमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला होता.

लडाख ते दर्चा मार्ग
भारताने लडाख ते हिमाचल प्रदेशातील दर्चा या दोन भागांना जोडणाऱ्या रस्त्याच्या उभारणीला वेग दिला आहे. हा मार्ग बर्फाच्छादित अशा डोंगर रांगांमधून जातो. या रोडची लांबी ही २९० किलोमीटर एवढी असून या रस्त्यामुळे लडाखमध्ये  शस्त्रे नेणे अधिक सोपे होणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या