सहा पर्वत शिखरांवर भारतीय जवानांचा कब्जा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मगर हिल, गुरंग हिल, रेशेन ला, रेझांग ला आणि फिंगर चार जवळील चीनच्या तळांवर जिथून सहज नजर ठेवता येते अशी काही ठिकाणे भारताने ताब्यात घेतली आहेत. 

नवी दिल्ली: पूर्व लडाखच्या ताबा रेषेवर भारताने चीनला जबरदस्त शह देताना मागील तीन आठवड्यांमध्ये सहा नव्या पर्वत शिखरांवर कब्जा केला आहे. भारताच्या जवानांनी २९ ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही सहा नवी ठिकाणे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मगर हिल, गुरंग हिल, रेशेन ला, रेझांग ला आणि फिंगर चार जवळील चीनच्या तळांवर जिथून सहज नजर ठेवता येते अशी काही ठिकाणे भारताने ताब्यात घेतली आहेत. 

मागील काही  दिवसांपासून चीनचा या पर्वत शिखरांवर डोळा होता. पॅंगॉंग सरोवराच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या भागावर चीनने याआधीही कब्जा करण्याचा प्रयत्न केला असून यातूनच सीमेवर तीनवेळा गोळीबाराचा प्रसंग घडला होता. भारतीय जवानांनी ताब्यात घेतलेली पर्वत शिखरे भारताच्याच हद्दीत असून या भागांतून चीनच्या हालचाली सहज टिपता येतात. रणनितीकदृष्ट्या विचार केला तर  सध्या चीनचे लष्कर हे अधिक उंचावरील शिखरांवर असून त्यांना तिथून भारताच्या हद्दीमध्ये काय सुरू आहे, यावर लक्ष ठेवता येते. ही शिखरे भारताने मिळवल्याने उभय देशांचे सैन्य ताबारेषेवर समोरासमोर उभे ठाकले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या