विश्वातल्या  सर्वात दूरच्या आकाशगंगेचा शोध

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

 भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली:  भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

भारतीय खगोलशास्त्रज्ञांची ही कौतुकस्पद कामगिरी आज  केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) ईशान्य क्षेत्र विकास, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणू ऊर्जा आणि अंतराळ विभाग, डॉ जितेंद्र सिंग यांनी सामायिक केले आहे. भारतीय खगोलशास्त्रज्ञांची ही कामगिरी भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, असे डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. भारताची ‘मल्टी-वेव्हलेंथ स्पेस’वेधशाळा- ‘अॅस्ट्रोसॅट’ने पृथ्वीपासून ९.३ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या आकाशगंगेमधून अति-अतिनील किरणे सापडली आहेत. ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका या पुण्याच्या संस्थेच्या एका शास्त्रज्ञांच्या पथकाने डॉ. कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली या आकाशगंगेचा शोध लावला आहे. 

या आकाशगंगेच्या मूळ शोधाचे महत्व तसेच वेगळेपण याविषयी ब्रिटनमधून प्रकाशित झालेल्या ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’ या अतिशय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नोंदविण्यात आले आहे. भारताच्या अॅस्ट्रोसॅट- यूव्हीआयटीने शोधून काढलेल्या या आकाशगंगेविषयी नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपवरही पार्श्र्वध्वनीची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी लावलेल्या या अव्दितीय शोधाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. 

मंत्री जितेंद्र सिंग यांनी भारतीय खगोलशास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. भारताची अंतराळ संशोधन क्षमता आता एक वेगळ्याच, उत्कृष्टतेच्या टप्प्यावर पोहोचली आहे, असे संकेत आता मिळाले आहेत. जगाच्या इतर भागातल्या अंतराळ वैज्ञानिकांचे नेतृत्व आपले शास्त्रज्ञ करू शकतात, असे जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. प्राध्यापक श्याम टंडन यांनी भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी अथक परिश्रम केले आहेत, तसेच उच्च कोटीची संवदेनशीलता दाखवून दशकांपेक्षाही जास्त काळ यूव्हीआयटीच्या पथकाने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. 

आयुकाचे संचालक डॉ. सोमक राय चैधुरी यांनी  या विश्वाचे अंधकाराचे युग कसे संपुष्टात आले,आणि प्रकाश युग कसे अवतरले, याविषयीची माहिती या आकाशगंगेच्या शोधामुळे मिळण्याचे संकेत मिळत आहेत. प्रकाशाचा प्राथमिक स्त्रोत शोधणे अतिशय अवघड आहे, मात्र आता या आकाशगंगेच्या शोधामुळे ही वाटचाल सुकर बनणार असल्याचे डॉ. सोमक राय चैधुरी यांनी सांगितले. 

या नवीन आकाशगंगेचा शोध घेणाऱ्या भारताची पहिली अवकाश वेधशाळा- अॅस्ट्रोसॅटची स्थापना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने २८ सप्टेंबर २०१५ रोजी केली होती. इस्त्रोच्या पाठिंब्याने आयुकाचे माजी प्राध्यापक श्याम टंडन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही अवकाश वेधशाळा विकसित केली आहे.

संबंधित बातम्या