लडाखच्या पर्वतराजीत धडाडणार भारताच्या तोफा

PTI
गुरुवार, 16 जुलै 2020

वजनाला हलक्या रणगाड्यांच्या खरेदीला सरकारची मंजुरी

नवी दिल्ली

चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील आपली संरक्षणसज्जता वाढवायला सुरवात केली असून आता अति उंचावरील ठिकाणांवर तैनात करणे शक्य असणाऱ्या वजनाला हलक्या रणगाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या आयुधामुळे लडाखसारख्या अतिदुर्गम युद्धभूमीवर भारताला शत्रूशी दोन हात करणे सहज शक्य होईल. विशेष म्हणजे या रणगाड्यांची मारक क्षमता देखील अवजड रणगाड्यांसारखीच असेल.
सध्या केवळ रशियाच अशाप्रकारच्या वजनाला हलक्या रणगाड्यांची निर्मिती करतो. रशियन बनावटीच्या ‘स्प्रुट- एसडीएम १’ या रणगाड्यांची मारक क्षमता अधिक आहे. सध्या चीनने पूर्व लडाखमध्ये तैनात केलेल्या रणगाड्यांचे नाव हे ‘टी-१५/झेडटीपीक्यू’ असे आहे. मुळातच हे रणगाडे वजनाला हलके असल्याने त्यांची वाहतूक करणे देखील अधिक सोपे असते. अगदी पॅराशूटच्या माध्यमातून देखील या रणगाड्यांना सहज टेकडीवर पोचविता येईल. चीनने रणनितीक व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या स्थळांवर पोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची उभारणी केली आहे. भारताकडून देखील वेगाने अशाप्रकारचे रस्ते उभारले जात असले तरीसुद्धा ते प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे, त्यामुळे सध्या तरी हे रणगाडेच भारतासाठी महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. विशेष म्हणजे चीनकडे सध्या अशाप्रकारचे रणगाडे असून त्यांनी ते पूर्व लडाखमध्ये तैनात देखील केल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत.

‘पी-७ हेवी ड्रॉप सिस्टिम’ची
‘डीआरडीओ’कडून निर्मिती

लष्कराच्या पॅराड्रॉपिंग क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी भारताच्या संरक्षणविषयक संशोधकांनी ‘पी-७ हेवी ड्रॉप सिस्टिम’ विकसित केली आहे. यामुळे अतिउंचावर सात टनापर्यंतची युद्धसामग्री पोचविणे सहज शक्य होईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमधील (डीआरडीओ) शास्त्रज्ञांनी ही प्रणाली विकसित केली आहे. या संरक्षण उपकरणातील प्लॅटफॉर्म सिस्टिमच्या निर्मितीचे काम हे लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे.

काय आहे एअर ड्रॉप सिस्टिम?
प्रत्यक्ष आणीबाणीच्यावेळी किंवा युद्धसरावादरम्यान लष्कराला दारूगोळ्याची टंचाई भासू लागते तेव्हा रसद पुरविण्यासाठी पारंपरिक रस्त्याच्या मार्गाऐवजी या प्रणालीचा वापर करून आकाशातून रसद पुरविण्यात येते. एखाद्या विशिष्टस्थळी विमान उतरविण्याऐवजी पॅराशूटच्या माध्यमातून तेथे शस्त्रे टाकली जातात. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी फार वेळही लागत नसल्याने ही प्रणाली लष्करासाठी सोयीचे असते.

५ वर्षांपासून
प्रणालीच्या चाचण्या

७ टनांपर्यंतची
सामग्री पोचविणे शक्य

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या