भारतीय कंपन्यांत जगासाठी लस करण्याची क्षमता

PTI
शुक्रवार, 17 जुलै 2020

बिल गेटस यांचे गौरवोद्वार; सिरम इन्स्टिट्‌यूट,भारत बायोटेकचे काम उल्लेखनीय

नवी दिल्ली

भारतातील औषध कंपन्यात केवळ देशापुरतीच नाही तर संपूर्ण जगासाठी कोविड-१९ वर लस तयार करण्याची क्षमता असल्याचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी म्हटले आहे. बिल ॲड मेलिंडा गेटस फाउंडेशनचे सह संस्थापक आणि विश्‍वस्त बिल गेटस म्हणाले, की भारतात अनेक महत्त्वांच्या गोष्टी घडत असून तेथील औषधी कंपन्या कोविड-१९ वर लस तयार करण्याच्या कामाला लागली आहे. यापूर्वी उदभवलेल्या अन्य आजारांचा मुकाबला करताना देखील भारतातील औषध कंपन्यांची क्षमता सिद्ध झाली आहे.
कोविड-१० संसर्गाविरुद्ध भारताची लढाई या विषयावरील माहितीपट तयार केला असून तो एका वाहिनीवरून प्रसारित केला गेला. त्यात बिल गेटस यांनी भारतातील औषध कंपन्याबाबत विचार मांडले. ते म्हणाले की, भारत सध्या नागरिकांच्या आरोग्यावरून चिंतेत असून आव्हानाचा मुकाबला करत आहे. यामागे देशातील दाट वस्ती आणि लोकसंख्या हे प्रमुख कारण आहे. मात्र अन्य आजारांप्रमाणेही कोविड-१९ सारख्या महामारीवरही नियंत्रण मिळवणे शक्य आहे आणि हे तेथील औषध कंपन्यांमुळे साध्य होऊ शकते. ते म्हणाले की, भारतातील औषधी कंपन्यांकडे भरपूर क्षमता आहे. सध्या भारतात निर्माण होणारी औषधे आणि लसीची जगभरात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. अन्य देशांच्या तुलनेत भारतात लसनिर्मितीचे प्रमाण अधिक आहे. यात सिरम इन्स्टिट्यूट आघाडीची संस्था आहे. तसेच बायो-ई, भारत बायोटेक आणि अन्य कंपन्या देखील लक्षणीय काम करत आहेत. या सर्व कंपन्या कोरोना संसर्गावरील लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही या कंपन्यांनी अन्य आजारावर मात करण्यासाठी देखील लस निर्मिती करुन आपली क्षमता सिद्ध करुन दाखविली आहे.
मृत्यूचे प्रमाण कमी करणे गरजेचे
जागतिक पातळीवर लस विकसित करणारा समूह कोलिशन फॉर एपिडेमिक प्रियेर्डनेस इनोव्हेशन्स (सीइपीआय) शी देखील भारतीय कंपन्या जोडलेल्या आहेत. याबाबत ते म्हणाले की, भारतातील औषध कंपन्या केवळ भारतासाठीच नाही तर जगभरासाठी लस तयार करण्यासाठी सक्षम आहेत आणि याचा मला आनंद आहे. आपल्याला मृत्यूचे प्रमाण कमी करण्याची आवश्‍यकता आहे. प्रत्येकाने रोग प्रतिकारक होणे गरजेचे असून त्यानुसार कोरोनासारख्या महामारीला वेसन घालणे शक्य होईल.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या