खुशखबर.. देशाची अर्थव्यवस्था लवकच रूळावर येण्याची शक्यता !

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

विजेची १२ टक्क्यांनी वाढलेली मागणी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) वसुलीपोटी मिळालेला एक लाख कोटींहून अधिक रकमेचा महसूल ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याची चिन्हे आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

नवी दिल्ली :   विजेची १२ टक्क्यांनी वाढलेली मागणी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) वसुलीपोटी मिळालेला एक लाख कोटींहून अधिक रकमेचा महसूल ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याची चिन्हे आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विशेष चर्चा करण्यात आली.  हिमाचल प्रदेशातील लुहरी येथे २१० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, म्हणाले की कोरोना संकटामुळे घसरलेला अर्थव्यवस्थेचा गाडा आता पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. विजेची १२ टक्क्यांनी वाढलेली मागणी आणि जीएसटी वसुलीपोटी मिळालेला एक लाख कोटीहून अधिक महसूल हे अर्थव्यवस्थेतील सुधारणेची चिन्हे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांत पावसामुळे कृषी क्षेत्रातून विजेची मागणी कमी होती.  रेल्वेची वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नसल्यामुळे रेल्वेकडूनही विजेची मागणी नाही, असे असताना १२ टक्के वाढीव विजेची मागणी उद्योग क्षेत्राकडून नोंदविण्यात आली आहे. जीएसटी वसुली देखील १.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याखेरीज डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये झालेली लक्षणीय वाढ,  रेल्वेची वाढलेली माल वाहतूक, परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ, निर्यातवृद्धी हे अर्थव्यवस्थेतील सुधारणेची लक्षणे असल्याचा दावाही जावडेकर 
यांनी केला. 

हिमाचल प्रदेशातील लुहरी येथे २१० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पावर १ हजार ८१० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून वार्षिक ७७५ कोटी युनिट वीज त्यातून उत्पादित होईल. या जलविद्युत प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी टळेल. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट
कोरोनाची दुसरी लाट न आल्यास वर्षाअखेरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा आशावाद अर्थमंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात, सामाजिक अंतर पालनाला विटल्याने लोकांचे मिसळणे सुरू झाले आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या