‘ब्राह्मोस’च्या चाचणीने नौदल आणखी शक्तिशाली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर त्याने हवेमध्येच अत्यंत किचकट अशी वळणे घेत लक्ष्याचा अचूक भेद घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. नौदलाच्या भात्यामध्ये या नव्या क्षेपणास्त्राचा समावेश झाल्याने त्याची मारकक्षमता आणखी वाढणार आहे.

नवी दिल्ली- भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची आज अरबी समुद्रामध्ये स्वदेशी बनावटीच्या विनाशिकेवरून यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र झेपावल्यानंतर त्याने हवेमध्येच अत्यंत किचकट अशी वळणे घेत लक्ष्याचा अचूक भेद घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. नौदलाच्या भात्यामध्ये या नव्या क्षेपणास्त्राचा समावेश झाल्याने त्याची मारकक्षमता आणखी वाढणार आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून दूरवरच्या लक्ष्याचा यशस्वीरीत्या भेद घेता येईल, असे संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

भारत आणि रशियाची संयुक्त भागीदारी असणाऱ्या ‘ब्राह्मोस’ एअरोस्पेस या संस्थेच्या माध्यमातून या ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुड्या, जहाजा, विमाने आणि जमिनीवरील कोणत्याही प्रक्षेपक ठिकाणावरून सहज डागता येते. या क्षेपणास्त्राच्या  यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) स्वागत केले आहे. डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनीही चाचणी घेण्यात सहभागी असणारे शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्राच्या आगमनामुळे भारतीय लष्कराची ताकद अनेक पटींनी वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याआधीच्या चाचण्या

मागील काही आठवड्यांमध्ये भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ‘ब्राह्मोस’ आणि अॅंटी रॅडिएशन मिसाईल ‘रुद्रम-१’ची चाचणी घेतली आहे. लेसर गायडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि आण्विकहल्ल्याची क्षमता असणाऱ्या हायपरसॉनिक ‘शौर्य’ या क्षेपणस्त्राचीही यशस्वी चाचणी घेतली आहे. यातील ‘रुद्रम-१’ हे अॅंटी रॅडिएशन क्षेपणास्त्र महत्त्वपूर्ण मानले जाते. भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताने चीनला लागून असणाऱ्या सीमेवर लडाख आणि अरुणाचलमध्ये अनेक ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.
 

संबंधित बातम्या