गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सोहळ्यासाठी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे असतील. पणजी जिमखाना मैदानावर १९ रोजी सायंकाळी पाचशे जणांच्या उपस्थितीत गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

पणजी : गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे असतील. पणजी जिमखाना मैदानावर १९ रोजी सायंकाळी पाचशे जणांच्या उपस्थितीत गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, राष्ट्रपती १९ डिसेंबरला दुपारी गोव्यात येतील. त्यानंतर ते आझाद मैदानावर जाऊन हुतात्मा स्मारक परिसरात आदरांजली वाहतील. तेथून ते जिमखाना मैदानावर कार्यक्रमासाठी येणार आहेत. देशाचे प्रथम नागरीक या सोहळ्यासाठी येत आहेत, याचा आम्हा सर्वांना अभिमान असला पाहिजे. षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या आयोजन समितीची पहिली बैठक आज झाली. कोविड महामारीच्या काळात कमीत कमी उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत हा कार्यक्रम होईल. त्यानंतरच्या वर्षभरात कोणते कार्यक्रम आयोजित करावेत यावर प्राथमिक चर्चा आजच्या बैठकीत केली. कच्चा आराखडा तयार केला असून त्यासाठी समितीचे सदस्य शिफारशी करू शकतील. जनतेकडूनही सूचना मागवल्या जातील. सगळ्यांच्या सूचना विचारात घेऊन १० जानेवारीच्या दरम्यान या कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर वर्षभरात गाव पातळीवरही कार्यक्रम केले जाणार आहेत. यानिमित्तान अनेक स्पर्धा घेतल्या जातील. गोवा मुक्ती लढ्यात सहभागी इतर राज्यांतील स्वातंत्र्यसैनिकांचे किंवा त्यांच्या वारसांचा सन्मान केला जाईल. गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दपूर्तीचा लोगो तयार करण्याची स्पर्धा घेण्यात येत आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोचे सुदिन ढवळीकर, ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, खासदार विनय तेंडुलकर, फ्रान्‍सिस सार्दिन आदींनी महत्त्‍वाच्या सूचना या बैठकीत केल्या. कामत यांनी दिलेल्या शिफारशींवर विचार केला जाणार आहे.

 

संबंधित बातम्या