ओझं झालंय?....आता स्टेशनपर्यंत रेल्वेच घेऊन जाणार तुमचं घरातील सामान

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

BOW (Bags on Wheels) या ऍपच्या साहाय्याने (अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांना उपलब्ध असेल) रेल्वे प्रवासी आपले सामान आपल्या घरातून रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे स्टेशनवरुन घरी आणण्यासाठी अर्ज करु शकतील.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे पहिल्यांदाच बॅग्ज ऑन व्हील्स सेवेची सुरुवात करत आहे. उत्तर रेल्वेचा दिल्ली विभाग रेल्वे प्रवाशांसाठी ऍप संचलित ही सेवा देणार आहे. उत्तर आणि उत्तर मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर राजीव चौधरी यांनी सांगितले की, नव्या उपाययोजनांच्या माध्यमातून महसूल वाढवण्यासाठी रेल्वे सातत्याने प्रयत्नशील आहे. या दिशेने काम करताना दिल्ली विभागाने NINFRIS अंतर्गत ऍप आधारित बॅग्ज ऑन व्हील्स या नवीन सेवेची तयारी पुर्ण केली आहे. भारतीय रेल्वेची रेल्वे प्रवाशांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच सेवा असणार आहे.

BOW (Bags on Wheels) या ऍपच्या साहाय्याने (अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांना उपलब्ध असेल) रेल्वे प्रवासी आपले सामान आपल्या घरातून रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे स्टेशनवरुन घरी आणण्यासाठी अर्ज करु शकतील. रेल्वे प्रवाशाच्या बुकिंगच्या तपशीलानुसार प्रवाशाचे सामान सुरक्षितपणे त्याच्या कोच/घरी नेले जाईल.

घरापर्यंत असेल सेवा- 

नाममात्र शुल्कात, प्रवाशांना कंपनीकडून डोर-टू-डोर सामानाची ने-आण सेवा दिली जाईल. प्रवाशांच्या घरातून त्यांचे सामान त्याच्या कोचपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपासून घरापर्यंत सामानाची ने-आण करण्याची सेवा असेल. या सेवेचा रेल्वे प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग जन आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

प्रवासाआधीच ऐवज जाईल घरी- 

या नवीन सेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ट्रेन सुटण्यापूर्वी सामान पोहचल्याची खात्री केली जाईल. याचा फायदा म्हणजे प्रवाशांना कोचमध्ये सामान आणण्याच्या/ वाहून नेण्याच्या व्यापातून सुटका मिळेल आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रवास अनुभवता येईल. सुरुवातीला नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली कॅन्टोन्मेंट, दिल्ली सराय रोहिल्ला, गाझियाबाद आणि गुरुग्राम रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांना ही सेवा उपलब्ध होणार आहे.
या सेवेचा प्रवाशांना फायदा तर होईलच, शिवाय रेल्वेला वार्षिक 50 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या प्रवाशांनी आतापर्यंत पॅलेस ऑन व्हील्स सेवेचा आनंद लुटला आहे, आता त्यांना बॅग्ज ऑन व्हील्सच्या सेवेचा ही आनंद घेऊ शकतील.

संबंधित बातम्या