भारतीय अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

अवकाश क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये खासगी कंपन्यांना परवानगी देण्यासंबंधी स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी ‘भारतीय राष्ट्रीय अवकाश संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे

नवी दिल्ली

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे. अंतराळ यानाची बांधणी, उपग्रह निर्मिती आणि यानाच्या उड्डाणासाठीची सेवा आदी प्रकल्पांमध्ये काम करण्यास खासगी क्षेत्राला परवानगी देण्यात येईल, अशी माहिती ‘इस्त्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी गुरुवारी दिली.
‘इस्त्रो’च्या बहुग्रह मोहिमेतही खासगी कंपन्या भाग घेऊ शकतील, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खासगी कंपन्यांना अवकाश कार्यक्रमात सहभागी होण्यास मान्यता देण्यात आली होती. ‘‘इस्त्रोच्या प्रकल्पामध्ये कोणतीही कपात होणार नसून अंतराळावर आधारित कार्यक्रमांसह, प्रगत संशोधन आणि विकास, बहुग्रहीय व मानवी अवकाश मोहीम आदी उपक्रम या पुढेही सुरू राहणार आहेत,’’ असा विश्‍वास सिवन यांनी व्यक्त केला.

अवकाश क्षेत्र खुले केल्याने...
- अंतराळ तंत्रज्ञानासाठी संपूर्ण देशातील क्षमतेचा वापर करता येणार.
- अंतराळ विकास लवकर साध्य होणार.
- जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत भारतीय उद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान मिळण्यासाठी सक्षम करणे शक्य होणार.
- तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील.

 

संबंधित बातम्या