सैन्य माघारीवर एकमत

Dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

गलवान खोऱ्यातील तणाव निवळणार, अकरा तासांची लष्करी चर्चा यशस्वी, चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडूनही दुजोरा
 

नवी दिल्ली

गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर सीमावादावर चीनने आता नरमाईचा सूर आळवला आहे. ज्या भागात दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते, तेथून आता माघार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तब्बल अकरा तासांहून अधिक काळ चाललेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या वाटाघाटींदरम्यान ही सहमती झाली. आता चीनचे लष्कर या भागातून टप्प्याटप्प्याने माघार घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारत आणि चिनी दरम्यानची कोअर कमांडर पातळीवरील चर्चा बुधवारी सामंजस्याच्या वातावरणात सकारात्मकपणे पार पडली. चिनी हद्दीत चुशूल – मोल्डो येथे झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी तणाव असलेल्या भागातून माघार घेण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली. या बैठकीत पूर्व लडाख भागातून सैन्यदलांच्या माघारीच्या प्रक्रियेवरही चर्चा झाली असून दोन्ही बाजू अंमलबजावणीसाठी तयार झाल्या आहेत. दरम्यान, या सहमतीला चिनी परराष्ट्र मंत्रालयानेही आडवळणाने दुजोरा दिला. चिनी आणि भारतीय सैन्याच्या कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांची सोमवारी चर्चा झाली. 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतरची ही बैठक म्हणजे संवाद आणि सल्लामसलतीतून मतभेद हाताळण्यात दोन्ही पक्षांची सक्षमता दर्शविणारी असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केले आहे.
 

भारताचा इशारा
चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मतभेदाच्या मुद्द्यांवर या बैठकीत सखोल चर्चा झाल्याचे, तसेच तणाव कमी करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यावरही सहमती झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या चर्चेदरम्यान भारताने चीनला स्पष्ट शब्दात ठणकावले होते की गलवान, पँगाँग त्सो आणि हॉटस्प्रिंग भागातून चीनने माघार घ्यावी तसेच दोन मे पूर्वीची यथास्थिति होत नाही तोपर्यंत नियंत्रण रेषेवर तणाव राहील.

लष्करप्रमुख लडाखमध्ये
चीनसोबतच्या सहमतीनंतर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे लडाखमध्ये दाखल झाले असून चीनशी झालेल्या चर्चेचा आढावा घेण्याबरोबरच ते सीमेवरील स्थितीची पाहणी करतील. नरवणे यांनी दुपारी लडाख येथे पोचल्यानंतर लष्करी रुग्णालयात दाखल झालेल्या भारतीय जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात हे सैनिक जखमी झाले होते.
.
चीनकडून पुन्हा घूमजाव
भारतीय जवानांसोबत झालेल्या संघर्षात चाळीस चिनी सैनिक ठार झाल्याच्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या फेक न्यूज असल्याचा आरोप चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केला आहे. तत्पूर्वी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत चिनी अधिकाऱ्यांनी आमच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यासह काही सैनिक ठार झाल्याची कबुली दिली होती. या दाव्यानंतर नाचक्की होऊ लागल्याने चीनने पुन्हा घूमजाव केले आहे.
 

संबंधित बातम्या