आयएनएस विराट लवकरच भंगारात

पीटीआय
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

गुजरातमधील अलंग किनाऱ्यावर करणार भाग सुटे 

अहमदाबाद: भारतीय नौदलाची शान असलेली आयएनएस विराट ही युद्ध नौका ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाली. पुढील महिन्यात ही विमानवाहू नौका मुंबईहून गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जाणार आहे. तेथे तिचे भाग सुटे करण्यात येऊन भंगारात विकणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

लिलावात ३८ कोटींची बोली
‘विराट’ नौदलात १९८७ मध्ये सामील झाली होती. गेल्या महिन्यात मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे आयोजित केलेल्या लिलावात श्री राम ग्रुपने ३८. ५४ कोटी रुपयांत ती खरेदी केली. सध्या विराट मुंबईत नौदलाच्या तळावर उभी आहे. जहाज बांधणी महासंचालनालयाकडून आवश्‍यक परवानगी मिळाल्यानंतर ती पुढील महिन्यात अलंग येथे नेऊन तिचे सर्व भाग सुटे काढण्यात येणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष मुकेश पटेल यांनी सांगितले. या प्रवास तीन दिवसाचा असणार आहे. त्यानंतर नऊ ते बारा महिन्यांत देशातील पहिल्या अधिकृत पर्यावरणपूरक जहाज पुनर्बांधणी यार्डात ती भंगारात काढली जाणार आहे. आयएनएस विराट आधी २०१४ मध्ये मुंबईत आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे भाग सुटे  करण्यात आले होते.

विराटचा इतिहास

  •   रॉयल ब्रिटिश नौदलात नोव्हेंबर १९५९ ते एप्रिल ८४ या काळात एचएमएस हरमेस या नावाने सेवा
  •     १९८२ मध्ये अर्जेटिनाविरोधात फाॅकलंड युद्धात विजयी सहभाग 
  •     भारताकडून ८० च्या दशकात ६ कोटी ५० लाख डॉलरला खरेदी
  •     नूतनीकरणानंतर ‘आयएनएस विराट’नावाने १२ मे १९८७ मध्ये नौदलाच्या सेवेत रुजू
  •     सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू नौका
  •     तीस वर्षांच्या सेवेनंतर मार्च २०१७ मध्ये निवृत्त
  •     सागरी संग्रहालय म्हणून जतन करण्याचे अनेक प्रस्ताव
  •     नौदलाशी सल्लामसलत करून भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याची केंद्राचे गेल्या जुलैत संसदेत प्रतिपादन
     

संबंधित बातम्या