Delhi Tractor Parade: कायदा व सुव्यवस्थेसाठी दिल्लीतील काही भागात इंटरनेट सेवा बंद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळेस शेतकऱ्यांनी दिल्लीतील काही भागात तीव्र निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळेस शेतकऱ्यांनी दिल्लीतील काही भागात तीव्र निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यात झडप झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता दिल्लीतील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर दिल्लीतील नांगलोई भागात इंटरनेट सेवा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. 

Delhi Tractor Parade: लाल किल्ल्यावर फडकला शेतकरी आंदोलनाचा ध्वज

नव्या कृषी विधेयकातील तीन कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ आंदोलन करत आहेत. त्यानंतर या विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत आज ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. यावेळेस शेतकरी आणि पोलीस आमने-सामने आल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने सिंघू, गाजीपूर, टिकरी, मुबारका चौक, नागलोई व लगतच्या परिसरातील इंटरनेट सेवा रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

त्याचबरोबर, नवी दिल्लीतील काही भागात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यामुळे दिल्ली ट्रेडर्स असोसिएशनने मंगळवारी कॅनॉट प्लेस बंद ठेवण्याची घोषणा केली. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन कॅनॉट प्लेस बंद ठेवण्याचा सल्ला दिला असल्याचे,  दिल्ली ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भार्गव यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, आंदोलनासाठी मध्य दिल्लीत दाखल झालेले शेतकरी काही वेळाने लाल किल्ल्याच्या भागात पोहचले. व यावेळेस हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह लाल किल्ल्याच्या भागात पोहचल्यानंतर किल्ल्यावर ध्वज फडकावल्याचे चित्र पाहायला मिळाले.       

संबंधित बातम्या