‘आयपीएल’ सट्टा थांबता थांबेना!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

सध्या दुबईत अंतिम टप्प्यावर असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीसाठी अनेकांनी गोवा हे सुरक्षित ठिकाण असल्याने फ्लॅट तसेच बंगले भाडेपट्टीवर घेऊन ऑनलाईनद्वारे सट्टा घेत आहेत.

पणजी : सध्या दुबईत अंतिम टप्प्यावर असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीसाठी अनेकांनी गोवा हे सुरक्षित ठिकाण असल्याने फ्लॅट तसेच बंगले भाडेपट्टीवर घेऊन ऑनलाईनद्वारे सट्टा घेत आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने काल मध्यरात्री हडफडे येथे छापा टाकून गुजरातच्या तिघांना अटक केली. आतापर्यंत या तिघांनी सुमारे १.१७ कोटीहून अधिक सट्टा ऑनलाईनद्वारे घेतला असल्याचे प्राथमिक चौकशी उघड झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

या सट्टेबाजीप्रकरणी अटक केलेल्‍यांची नावे शक्ती पंजाबी, विशाल अहुजा व हितेश केशवाणी अशी आहेत. हे सर्वजण गांधीधाम - गुजरात येथील असून भाडेपट्टीवर घेतलेल्या ग्रीन व्हिजन बंगल्यामध्ये कालच्या आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी ऑनलाईनवर मोबाईलने सट्टा स्वीकारत होते व ते हायटेक संगणक सॉफ्टवेअरचा वापर करून लॅपटॉपवर त्याची नोंद करत होते. यावेळी त्यांच्याकडून सट्टेबाजी स्वीकारण्यासाठी वापरण्यात येत असलेले मोबाईल फोन व लॅपटॉप तसेच इतर यंत्रणा जप्त करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांत कळंगुट पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी चार प्रकरणे नोंद करून मोठ्या प्रमणात सट्टेबाजीसाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर यंत्रणा तसेच काही रोख रक्कमही जप्त केली होती. क्राईम ब्रँचने सट्टेबाजीप्रकरणी घातलेला हा दुसरा छापा आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही सट्टेबाजीविरोधात  पोलिसांना दक्षतेच्‍या सूचना केल्‍या आहेत.

संबंधित बातम्या