भारताच्या ‘शुक्रयाना’कडे जगाच्या नजरा

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

शुक्र ग्रहावर ‘फॉस्फिन’ नावाचे जैविक संयुग सापडल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत घोषित केले. या घोषणेनंतर जगभरातील अवकाश संशोधन संस्थांच्या नजरा पुन्हा एकदा शुक्राकडे वळल्या आहेत.

पुणे: शुक्र ग्रहावर ‘फॉस्फिन’ नावाचे जैविक संयुग सापडल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत घोषित केले. या घोषणेनंतर जगभरातील अवकाश संशोधन संस्थांच्या नजरा पुन्हा एकदा शुक्राकडे वळल्या आहेत. भारतासह अमेरिका आणि रशियाच्या आगामी काळात शुक्र मोहिमा आहेत. मात्र, सर्वांत नजीकच्या काळात २०२३ मध्ये शुक्रावर जाणारी आणि सध्या अंतिम योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या ‘शुक्रयान-१’कडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. 

पृथ्वीच्या जवळचा ग्रह असलेल्या शुक्रावर वातावरण असून, त्यामध्ये प्रथमच जैविक घटक सापडला आहे. एक फॉस्फरस आणि तीन हायड्रोजन अणूपासून बनलेला ‘फॉस्फिन’  हे संयुग सुक्ष्मजीवांच्या जैविक अभिक्रियेतून तयार होते. रंगहीन असलेले हे संयुग विषारी आहे. पर्यायाने जीवसृष्टीच्या संभाव्य पाऊलखुणा शोधण्यासाठी संपूर्ण सूर्यमालेत शुक्र ग्रह महत्त्वपूर्ण बनला आहे. 

कशी असेल संशोधनाची दिशा? 
कार्डिफ विद्यापीठाच्या प्रा.जेन ग्रीव्हज यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने हवाई येथील जेसीएमटी आणि चिली येथील अल्मा या दुर्बिणीच्या सहाय्याने फॉस्फिनची पुष्टी केली आहे. पृथ्वीच्या तुलनेत शुक्राच्या वातावरणात सापडलेल्या या संयुगाचे प्रमाण खूप जास्त आहे. क्‍योट्यो विद्यापीठाचे प्रा. हिडियो सगावा म्हणतात, फॉस्फिनची निर्मिती जैविक अभिक्रियेने झाली का, हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष शुक्रावर यान सोडावे लागेल. शुक्रावरील वातावरण पृथ्वीसारखे शांत नसून प्रचंड उलथापालथ आणि आम्लाचे ढग आहेत. तसेच सूर्यापासून शुक्र तुलनेने जवळ असल्याने यान उतरवण्याचे मोठे आव्हान आहे. 

 भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २०२३ मध्ये ‘शुक्र’ ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी शुक्रयान-१ ही मोहीम आखली आहे. नजीकच्या काळात शुक्रावर जाणारी सध्यातरी एकमेव मोहीम असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. शुक्राच्या वातावरणातील ढगांमध्ये सूक्ष्मजीवांची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४० किलोमीटर अंतरावर सूक्ष्मजीव सापडल्याचे नासाच्या अवकाश मोहिमांतून तसेच इस्रोच्या ‘बलून’ प्रयोगातून सिद्ध झाले आहे. पर्यायाने शुक्राच्या बाबतीतही ही पाहणी करण्यात येईल. साधारणपणे १०० किलोग्रॅमचा पेलोड नेणाऱ्या या मोहिमेत भारतासह आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांचे देखील पेलोड असतील. कोरोनाकाळातील लॉकडाउनचा परिणामही या मोहिमेवर होण्याची दाट शक्‍यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या