निजामुद्दीन मरकजशी कुंभमेळ्याची तुलना करणं अयोग्य- तिरथसिंह रावत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

कुंभमेळा आणि मरकजमधील फरक अधोरेखित करत असताना कुंभमेळामध्ये जमा झालेले लोक बाहेरचे नसून ते आपले लोक आहेत असं त्यांनी म्हटलं.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरखंडमध्ये कुंभमेळा होत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्याची तुलना बंदिस्त ठिकाणी पार पडलेल्या आणि परदेशी नागरिकांनी सहभाग घेतलेल्या निजाममुद्दीन मरकजसोबत करण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. कुंभमेळ्यात सहभागी सुरु झालेले भाविक बाहेरचे नसून आपलेच लोक आहेत असा युक्तिवाद तिरथ सिंह रावत यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे. तसेच कुंभमेळा हा 12 वर्षातून एकदाच येतो आणि लोकांच्या श्रध्दा आणि भावनेचा विषय असल्याचही ते यावेळी म्हणाले. लोकाचं आरोग्य प्राथमिकता आहे, परंतु श्रध्देकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

 तिरथ सिंह रावत यांनी निजामुद्दीन मरकज आणि कुंभमेळ्याची तुलना का करण्यात   येऊ नये असं विचारण्यात आलं होतं. कारण कुंभमेळ्यात मोठ्यासंख्येने गर्दी होत असून आणि त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात हातभार लावण्याची भीती आहे. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, ‘’मरकज आणि कुंभमेळा यामध्ये कोणत्याही प्रकारची तुलना होता कामा नये. मरकजचा कार्यक्रम हा एका बंदिस्त ठिकाणी पार पडला होता. पण कुंभमेळा मोकळ्या ठिकाणी एका खुल्या जागेत पार पडत आहे, असं तिरथ सिंह रावत यांनी सांगितलं आहे.

देशातील पहिलीच घटना; कोरोना लस चोरीला

कुंभमेळा आणि मरकजमधील फरक अधोरेखित करत असताना कुंभमेळामध्ये जमा झालेले लोक बाहेरचे नसून ते आपले लोक आहेत असं त्यांनी म्हटलं. मरकजचा कार्यक्रम ज्यावेळी पार पडला तेव्हा कोरोनासंबंधी जागृती नव्हती किंवा कोणतीही नियमावली तयार करण्यात आली नव्हती. कार्यक्रमासाठी हजेरी लावणारे किती काळ तेथे वास्तव्यास होते याची कोणालाही कल्पना नव्हती, असं यावेळी त्यांनी सांगितलं. परंतु आता कोरोनाबद्दल जागरुकता असून आता कोरोनाच्या संबंधी नियमावली देखील आहे असं ते म्हणाले.
 

संबंधित बातम्या