श्रीनगरमध्ये हिमवर्षाव सुरूच..४५०० वाहने अडकली

PTI
गुरुवार, 7 जानेवारी 2021

काश्‍मीरमध्ये सलग हिमवृष्टी सुरू असल्याने विमान सेवा स्थगित करण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे. जवाहर बोगद्याच्या परिसरात चार फुटांपर्यंत बर्फ साचल्याने वाहतूक सुरू होऊ शकली नाही.

श्रीनगर :  काश्‍मीरमध्ये सलग हिमवृष्टी सुरू असल्याने विमान सेवा स्थगित करण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे. जवाहर बोगद्याच्या परिसरात चार फुटांपर्यंत बर्फ साचल्याने वाहतूक सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बर्फ बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
जवाहर बोगद्याजवळ बर्फ असल्याने जम्मू-श्रीनगर महामार्ग आजही बंद ठेवण्यात आला. तसेच समरोली, मगरकोट, पंथयाल, मारोग, कॅफेटेरिया मोर, धलवास, नशरी येथेही भूस्खलन झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडथळे येत आहेत.

यामुळे सुमारे ४५०० वाहने अडकून पडली असून त्यात बहुतांश वाहने मालवाहतूक करणारी आहेत. हिमवृष्टीमुळे आज दिवसभरात सुमारे १० ते १२ उड्डाणे रद्द केल्याचे श्रीनगर विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले. तत्पूर्वी हिमवर्षावामुळे ३,४ आणि ५ जानेवारीला विमान सेवा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन आजही विस्कळीत राहिले. सततच्या हिमवृष्टीमुळे काही घरांची हानीही झाल्याचे वृत्त आहे. श्रीनगर येथे गेल्या चोवीस तासात ३४.७ सेंटीमीटर बर्फ पडला. तसेच काझीगुंद येथे ३३.७ सेंटीमीर हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली. पहेलगाम येथेही नव्याने हिमवृष्टी झाली असून तेथे २९ सेंटीमीटर तर कोकेनर्ग येथे १७ सेंटीमीटर हिमवृष्टी झाली. 

काश्‍मीरमध्ये ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

उत्तर काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात त्रेहगाम येथे एका ७४ वर्षाच्या महिलेचा छत कोसळल्याने मृत्यू झाला. राणी बेगम असे मृत महिलेचे नाव असून घरावर बर्फ पडल्याने छत कोसळले. 

जम्मूमध्ये संततधार

जम्मू :  जम्मूमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून बुधवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासांत ५० मि.मी. पावसाची नोंद झाली.  गेल्या दोन दशकांतील हा  जानेवारी महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. बुधवारी सकाळी मात्र पाऊस थांबल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या पावसामुळे तावी नदी दुथडी भरून वाहू लागली. मात्र, तिचा प्रवाह धोक्याच्या खुणेखाली होता. जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बनिहाल प्रदेशातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. तिथे ०.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. त्याचप्रमाणे, ८० मि.मी.पाऊस व हिमवृष्टीचीही नोंद झाली. वैष्णोदेवीला जाणाऱ्या पर्यटकांचा बेस कॅम्प असणाऱ्या कटरात ४७ मि.मी.पाऊस पडला.   जम्मूत यापूर्वी, १३ जानेवारी २००० रोजी जानेवारीतील सर्वाधिक ८१ मि.मी. पाऊस पडला होता. जम्मू शहराचे किमान तापमान १२.१ इतके नोंदविले गेले.

 

अधिक वाचा :

आंदोलक शेतकरी आज राजधानी दिल्लीला चहूबाजूंनी घेरणार.. 

 

संबंधित बातम्या