रियाच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला

PTI
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

सुशांतच्या मृत्यूला रिया जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी करत रियाविरोधात पाटण्यात तक्रार नोंदविली आहे.

नवी दिल्ली

अभिनेता सुशांतसिंह मृत्युप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच, या प्रकरणातील सर्व पक्षकारांना न्यायालयाच्या या प्रकरणातील आधीच्या निर्णयांची माहिती १३ ऑगस्टपूर्वी सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. पुढील सुनावणी १३ तारखेला होणार आहे.
सुशांतच्या मृत्यूला रिया जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी करत रियाविरोधात पाटण्यात तक्रार नोंदविली आहे. तसा गुन्हाही दाखल झाला असून हा गुन्हा मुंबईत वर्ग करावा, अशी मागणी करत रियाने याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. सुशांतच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसतानाही या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नसून हे चुकीचे असल्याचे म्हणणे केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडले. सुशांतच्या वडिलांनीही, सुशांतला कुटुंबापासून दूर ठेवले जात होते, असा दावा करताना आपल्या मुलाच्या गळ्यावर बेल्टच्या खुणा होत्या, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला कोणी पाहिला नाही, असाही आरोप केला. बिहार सरकारनेही मुंबई पोलिसांच्या तपास प्रक्रीयेवर संशय व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने मात्र, या प्रकरणी बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा पुन्हा एकदा केला. याबाबतीत जे झाले ते बेकायदा आहे, असे न्यायालयात सांगण्यात आले.

सीबीआय चौकशी हवी की नको?
या प्रकरणी सीबीआयकडे चौकशी सोपविली तरी चालेल, असे रिया चक्रवर्तीने याचिकेत म्हटले होते. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने विचारणा करताच रियाच्या वकीलांनी सीबीआयकडे तपास सोपविण्याविरोधात सूर लावला. वकील श्‍याम दिवाण म्हणाले की, आम्हाला निष्पक्ष तपास हवा आहे. ज्या पद्धतीने सीबीआयकडे तपास सोपविला, त्यावरून आमच्या मनात शंका निर्माण होत आहे. त्यामुळे हे प्रकरण आधी मुंबई पोलिसांकडे सोपवावे, नंतर बघता येईल.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या