नवीन विषाणू नियंत्रणासाठी कर्नाटक सावध; क्‍वारंटाईन सक्‍ती

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

मंगळवारपासून कर्नाटक विमानतळावर कियोस्क ठेवून तेथे तपासणी केली जाईल

बंगळूर : ब्रिटनमध्ये (युके) कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार सापडला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी त्याची तीव्रता अधिक नाही. तथापि, सावधगिरीसाठी काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच मंगळवारी (ता. २२) रात्रीपासून ब्रिटनहून येणारी विमानसेवा रोखण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. कोविड संसर्गाच्या नियंत्रणासाठी सोमवारी (ता. २१) विधानसौधमध्ये बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ब्रिटन, डेन्मार्क आणि नेदरलॅंड्‌ससारख्या युरोपियन देशांमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. या विषाणूच्या संसर्गाची गती वाढली आहे. परंतु, हा रोग गंभीर नाही. तरीही सावधगिरी बाळगण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी रात्रीपासून ब्रिटनहून भारतात येणारी उड्डाणे रोखण्यात येतील, असे केंद्र सरकारने एका पत्राद्वारे कळविले आहे. रविवारी (ता. २०) राज्यात ब्रिटिश एअरवेजने २९१ प्रवासी आले होते. तर एअर इंडियातून २४६ प्रवासी आले. त्यामधील १३८ जणांना एका आठवड्यासाठी होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. मंगळवारपासून विमानतळावर कियोस्क ठेवून तेथे तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या नवीन प्रकाराला रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताचा भव्य उत्सव सोडून द्यावा लागेल. काही हॉटेल बुक केली गेली आहेत आणि सेलिब्रेशनसाठी तयार आहेत. तसे केल्यास कारवाई केली जाईल. सरकारला लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे. नवीन व्हायरस आढळल्यास त्यांना अधिक काळजी घ्यावी लागेल.

गेल्या १४ दिवसांत परदेशातून राज्यात आलेल्यांनी आरटीपीसीआर चाचणी करवून घ्यावी. ब्रिटन व इतर देशांतील लोकांना सात दिवसांसाठी अलग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही ब्रिटनमधील लोकांना सात दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. शैक्षणिक उपक्रमाबाबत घेतलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉ. सुधाकर यांनी दिली.

संबंधित बातम्या