कर्नाटक सरकारचे 1,610 कोटींचे पॅकेज

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

पुष्प पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टर 25,000 रुपये भरपाई देण्यात येईल. तर मागणीतील घट व वाहतुकीच्या असमर्थतेमुळे नुकसान सोसावे लागलेल्या फळे आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे.

बंगळूर

 लॉकडाऊन काळात शेतकरी, विणकर, असंघटित क्षेत्रातील कामगार, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आदींना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी 1 हजार 610 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर विणकरांना आर्थिक मदत देण्यासाठी नवीन योजनाही जाहीर केली.
पॅकेजअंतर्गत लॉकडाऊन काळात मागणीअभावी पुष्प पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टर 25,000 रुपये भरपाई देण्यात येईल. तर मागणीतील घट व वाहतुकीच्या असमर्थतेमुळे नुकसान सोसावे लागलेल्या फळे आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसायाची संधी गमावलेले न्हावी, धोबी, कॅबचालक आणि ऑटोचालकांसारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रत्येकी 5000 रुपये एकवेळची भरपाई देण्यात येईल. या पॅकेजमुळे सुमारे 2.3 लाख न्हावी, 60 हजार धोबी तर 7 लाख 75 हजार ऑटो व कॅब चालकांना फायदा होईल. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 3000 रुपयांची अतिरिक्त सवलत जाहीर केली आहे. यापूर्वी मजुरांना 2000 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यात आता 3000 रुपयांची वाढ होणार आहे. याचा लाभ 15.80 लाख बांधकाम कामगारांना होईल.
लघू व मध्यम उद्योगांनाही (एमएसएमई) लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. त्यांना तोटा सहन करावा लागला आहे. त्यांना पुनरुज्जीवित होण्यास थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे, सरकारने वीज बिलांचे मासिक स्थिर आकार दोन महिन्यांसाठी माफ केले जाईल, असे सांगितले. मोठ्या उद्योगांच्या वीज बिलांतील स्थिर आकारावरील दंड व व्याज माफ करून बिल भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.
वेळेवर बिले भरणाऱ्या लोकांनाही पॅकेजंतर्गत सवलत व प्रोत्साहन देण्यात आले आहे. विलंब झालेल्या देय रकमेवरील व्याजात कपात होईल. बिले भरणाऱ्या ग्राहकांना आगाऊ प्रोत्साहन दिले जाईल. हप्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जातील. वीज बिलाची थकबाकी न भरलेल्या ग्राहकांचे कनेक्‍शन 30 जूनपर्यंत तोडण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

चौकट :
विणकर सन्मान योजना
राज्य सरकारने 2020-21 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 109 कोटी रुपयांच्या विणकर कर्जमाफीव्यतिरिक्त विणकरांसाठी नवीन योजना जाहीर केली. या "विणकर सन्मान योजनें'तर्गत सुमारे 54 हजार हातमाग विणकरांना त्यांच्या बॅंक खात्यात 2000 रुपये जमा केले जातील.

संबंधित बातम्या