कर्नाटक राज्यपालांसह काही मंत्रीही क्वारंटाईन

अवित बगळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; येडियुरप्पांच्या कन्येसह सहा कर्मचारी बाधित

बंगळूर

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय सचिव, साहाय्यक आणि सुरक्षारक्षकांची तपासणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले राज्यपाल वजुभाई वाला यांच्यासह काही मंत्र्यांची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांनी स्वत:हून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून मुख्यमंत्र्यांची कन्या पद्मावती यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे प्रकृती उपचाराला चांगली साथ देत असली, तरी त्यांना रुग्णालयात 8 ते 10 दिवस राहावे लागेल, अशी माहिती आरोग्याधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. परंतु, एका आठवड्यासाठी ते विलगीकरणात गेल्याचे राजभवनातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या थेट संपर्कात आलेल्या गृहमंत्री बसवराज बोम्मई यांचाही अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी ते चार दिवस क्वारंटाईन झाले आहेत. महसूलमंत्री आर. अशोक आणि नगरविकास मंत्री बैराती बसवराज यांचा सेल्फ क्वारंटाईनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ क्वारंटाईन झालेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्कात आलेले मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, पोलिस महासंचालक प्रवीण सूद, गुप्तचर विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक तसेच अन्य अधिकारी क्वारंटाईनमध्ये न जाता कर्तव्य बजावत आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान कावेरी आणि त्यांचे गृह कार्यालय कृष्णा येथे निर्जंतुकीकरणासह त्यांचे संपर्क शोधण्यासाठी आरोग्याधिकारी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कांना अलग ठेवण्याच्या सुविधांकडे नेण्यासाठी तब्बल चार रुग्णवाहिका दोन्ही ठिकाणी दाखल झाल्या. आरोग्य व बीबीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी डॉलर्स वसाहतीतील मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक निवासस्थानी आणि धवलगिरीच्या आसपासच्या भागात स्वच्छताही केली. सध्या सुरक्षा कर्मचारी, स्वयंपाक, गृह व्यवस्थापन कर्मचारी आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांवर चाचण्या घेण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांची चाचणी
मुख्यमंत्र्यांचे गनमॅन, चालक आणि कावेरीतील तीन कर्मचाऱ्यांसह सहा जण कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना कोविड केअर केंद्रात हलविण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री येडियुरप्पा मणिपाल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच त्यांची कन्या पद्मावती यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांची स्वॅब चाचणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या