कर्नाटकात सीमा खुल्या, क्वारंटाईनची सक्ती मागे

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

प्रवासी वाहतुकीला परवानगी; कार्यवाही सुरू

बेळगाव: आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी असलेली ई-पासची सक्ती सोमवारी (ता. २४) कर्नाटक सरकारने मागे घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात २२ ऑगस्टला स्पष्ट आदेश बजाविले आहेत. त्याची कर्नाटकने कार्यवाही सुरु केली आहे. यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र आणि कर्नाटक-गोवा सीमेवरील चेकपोस्ट हटविण्यात आले आहेत. तसेच आंतरराज्य प्रवास करण्यात आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती होती तीही रद्द करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तब्बल पाच महिन्यांनंतर आंतरराज्य वाहतुकीसाठी विनाअट मार्ग खुले झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर केले. तेव्हापासून आजपर्यंत आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवर निर्बंध होते. तसेच काही संदर्भात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासही निर्बंध होते. वैद्यकीय उपचार किंवा अत्यावश्‍यक सेवा वगळता उर्वरित संदर्भात निर्बंध होते. त्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंतरराज्य वाहतुकीला सशर्त परवानगी देण्यात येत होती. परंतु, त्याचा विविध क्षेत्रांना गंभीर फटका बसला. आर्थिक विकास, वाहतूक आणि रोजगारावर परिणाम झाले. यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव अजयकुमार भल्ला यांनी यासंदर्भात २२ ऑगस्टला आंतरराज्य वाहतुकीबाबतचे निर्बंध उठविण्याचे आदेश दिले. ई-पास, वाहतूक परवानगी, मंजुरी संदर्भात अटी मागे घेण्याची सूचना सर्वच राज्यांना केली होती. त्याची कार्यवाही कर्नाटकने सुरु केली. आंतरराज्य प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची सक्ती मागे घेतल्याचे सोमवारी जाहीर केले आहे. तसेच क्वारंटाईनची अट मागे घेतल्याचेही आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे तब्बल पाच महिन्यानंतर कर्नाटक राज्याची सीमा खुल्या झाल्या आहेत.

मागे घेण्यात आलेले निर्बंध 

  •   सेवा-सिंधूवर ऑनलाईन नोंदणीची सक्ती नाही 
  •   सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळावर वैद्यकीय चाचणी नाही
  •   प्रवासादरम्यान जिल्हा पातळीवरील चाचणीही रद्द
  •   प्रवाशांचे वर्गीकरण होणार नाही
  •   परराज्यातून आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन रद्द 
  •   विलगीकरण आणि वैद्यकीय चाचणी नाही
     

संबंधित बातम्या