कर्नाटकने उघडले टाळे

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

बसवाहतुकीसह ऑटो, टॅक्‍सी, सलून दुकाने, उद्याने नियमांसह सुरू, रविवारी राहणार संपूर्ण लॉकडाऊन

बंगळूर

गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्नाटक सरकारने काही प्रमाणात शिथीलतेची घोषणा केली. तथापि, 31 मे पर्यंत प्रत्येक रविवारी पूर्ण राज्य बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्‍यक सेवा वगळता रविवारी कोणत्याही कामांना परवानगी नसेल. रविवारी कोणत्याही दुकानांना काम करण्याची परवानगी नाही. लोकांनाही प्रवास करण्यास मनाई असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली. 
मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर सोमवारी सकाळी लॉकडाऊनवरील निर्बंध कमी केल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. येडियुराप्पा म्हणाले, "कर्नाटकने मंगळवारपासून ऑटो, टॅक्‍सी, आणि सरकारी आणि खासगी अशा दोन्ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंटोन्मेंट झोनमध्ये सुरक्षा आणि सतर्कता अधिक वाढविण्यात येईल. लॉकडाउन उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करण्यात येतील. लोकांना मदत करण्यासाठी निर्बंधांसह सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विभागाच्या बसेस रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र धावतील. खासगी बसेसमधून एकावेळी फक्त 30 लोकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन, मास्क घालणे या गोष्टी प्रवाशांनाही सक्‍तीच्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणात खटले दाखल केले जातील.'
ते म्हणाले, परराज्यातून येणाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि आपत्कालीन आवश्‍यकता असणाऱ्यांनाच परवानगी देण्यात येईल. ऑटो आणि टॅक्‍सीमध्ये दोन प्रवासी तसेच चालक असू शकतात. मॅक्‍सीकॅबमध्ये तीन प्रवासी व चालकास परवानगी आहे. ही परवानगी मंगळवारपासून सुरू केली जाईल. मॉल वगळता सिनेमा, हॉटेल, रेस्टॉरंट्‌स आणि सर्व दुकाने कार्य करू शकतात. राज्यामध्ये मर्यादित रेल्वे गाड्यांनाही परवानगी आहे. सलून दुकाने उघडले जाऊ शकतात. उद्याने सकाळी 7 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 या वेळेत खुली राहातील. आरोग्य विभाग रेड झोनचे वर्गीकरण करेल. कोरोना बाधित जास्त प्रमाण असलेल्या भागांना कंटेन्मेंट झोन घोषित केले जाईल. लोक कसे सहकार्य करतात, ते 31 मे पर्यंत पाहून पुढे स्वायत्तता देण्यात येईल. शिथिलता मागे घ्यायचे की नाही याचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल.'
ते म्हणाले, "बसमध्ये प्रवासी संख्या 30 पर्यंतच ठेवण्यात येणार असली तरी आम्ही सध्या बसच्या भाड्यात वाढ करणार नाही. प्रवासी संख्या कमी असल्याने केएसआरटीसीला नुकसान सहन करावे लागेल. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी लागू असेल. फेरीवाले आणि विक्रेत्यांनाही काम करण्यास परवानगी देण्यात येईल.'

रविवारी संपूर्ण बंद
राज्यात काही नियम लादून लोकांच्या सोयीसाठी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पण, 31 मे पर्यंत प्रत्येक रविवारी राज्यातील संपूर्ण व्यवहार बंद राहतील. अत्यावश्‍यक सेवा रविवारी सुरू राहतील. याकाळातील रविवारी पूर्वीप्रमाणेच कडक संचारबंदी असेल. लोक कशापद्धतीने सहकार्य करतील, त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.

हे सुरू राहाणार
सरकारी आणि खासगी बस सेवा
मर्यादित प्रवाशांसह ऑटो, टॅक्‍सी
निर्बंधासह सार्वजनिक वाहतूक
सिनेमा, हॉटेल, रेस्टॉरंट्‌स 
सर्व प्रकारची दुकाने
सलून व्यवसाय
फेरीवाले विक्रेते
वेळेच्या बंधनात उद्याने 

हे बंद राहणार
मॉल, जीम, सभा
पर राज्यातून येणाऱ्यांवर निर्बंध
सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी

संबंधित बातम्या