काश्‍मीरमध्ये २४ तासांत ८ दहशतवादी ठार

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी सुरू असून, पम्पोरमध्ये गुरुवारी चकमकीमध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. तर इतर दोन दहशतवादी हे मशिदीत जाऊन लपले होते.

जावेद मात्झी 
श्रीनगर

भारतीय लष्कराने जम्मू-कश्मीरच्या शोपियाँ आणि अवंतीपोरा परिसरामध्ये मागील २४ तासांत आठ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यातील पाच दहशतवाद्यांना शोपियांमध्ये, तर तीन दहशतवाद्यांना अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीदरम्यान ठार मारण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह आणि लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी शुक्रवारी सकाळी आठ दहशतवादी मारले असल्याची माहिती दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी सुरू असून, पम्पोरमध्ये गुरुवारी चकमकीमध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. तर इतर दोन दहशतवादी हे मशिदीत जाऊन लपले होते. शुक्रवारी सकाळी जवानांकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) कमांडो मशिदीत घुसले व दोन्ही दहशतवाद्यांचा खातमा केला. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर शोपियाँ जिल्ह्यातील बंडपावा परिसरात चकमक सुरू असून, आत्तापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे. यातील एका दहशतवाद्याला काल ठार करण्यात आले होते, तर येथे अद्यापही चकमक सुरू असून, या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. संपूर्ण परिसराला सध्या जवानांनी वेढा दिलेला असून, शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला अटक
काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये गुरुवारी सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला अटक केले असून, त्याच्याकडून शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पकडण्यात आलेला दहशतवादी हा कुगामच्या रेदवानीचा इमरान दार आहे. तो नुकताच दहशतवादी संघटनेत भरती झाला होता.

संबंधित बातम्या