कुंभमेळा: मोदींच्या आवाहानाला स्वामी अवधेशानंद यांचे उत्तर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पध्दतीने करण्याची विनंती केली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच्या काळात उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरु आहे. देशभरातमधून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले आहेत. कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा तज्ञांकडून इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आहे. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पध्दतीने करण्याची विनंती केली आहे.

कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून, अनेक साधू आणि भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पध्दतीने करण्याचं आवाहन केलं आहे.(Kumbh Mela Swami Awadheshanands answer to Modis call)

मोदी यांनी ट्विट करुन याबद्दलची माहीती दिली आहे. ‘’आचार्य महामंडलेश्वर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतपरी सहकार्य करत आहे. याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पध्दतीने व्हावा. यामुळे संकटांशी लढण्याला ताकद मिळेल,’’ अस आवाहन मोदींनी केलं आहे.

‘’आमच्या लग्नाला या, पण कोरोनाची चाचणी केली तरच..’’

पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर स्वामी अवधेशानंद गिरी(Swami Avdheshanand) यांनी सुध्दा ट्विट केलं आहे. ‘’पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. जीवनाची रक्षण करणं मोठं पुण्य आहे. माझा जनतेला आग्रह आहे की, कोरोना परिस्थिती पाहता मोठ्या संख्येने स्नानं करण्यासाठी येऊ नये. त्याचबरोबर भाविकांनी नियमांचं पालन करावं,’’ असं स्वामी अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात अनेक साधू आणि भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे अनेक आखाड्यांनी कुंभमेळ्यातून परत जाण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यात झालेल्या कोरोनाच्या शिरकावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

 

संबंधित बातम्या