लालूप्रसाद यांना दुहेरी धक्का

Dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

रघुवंशप्रसादसिंह यांचा राजीनामा; पाच आमदार ‘जेडीयू’त दाखल

पाटणा

बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीच लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मंगळवारी जोरदार फटका बसला. पक्षाचे वरिष्ठ नेते व लालूप्रसाद यांच्याजवळचे नेते रघुवंशप्रसादसिंह यांनी आज राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्या आधीच ‘आरजेडी’च्या पाच सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जेडीयू) प्रवेश केला.
बिहारमध्ये पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ‘आरजेडी’चे पाच सदस्यांनी पक्षातून बाहेर पडून ‘जेडीयू’त प्रवेश करण्याची घोषणा केली. या पक्षांतराबरोबरच माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचे स्थानही धोक्यात आले आहे. यानंतर काही वेळातच रघुवंशप्रसादसिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला दुसरा धक्का दिला. बिहारमधील बाहुबली नेता रामासिंह यांना ‘आरजेडी’त प्रवेश देण्यावरून रघुवंशप्रसाद व अन्य वरिष्ठ नेते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. रामासिंह यांच्याकडून रघुवंशप्रसाद यांना हार पत्करावी लागली होती. त्यांच्या समवेत अनेक मोठे नेतेही यापुढील काळात पक्षाची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रघुवंशप्रसाद हे सध्या ‘एम्स’मध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.

विधानसभेतील ‘आरजेडी’चे अनेक सदस्य पक्षातून बाहेर पडण्यास तयार आहेत. ही पक्षाची मोठी पडझड असेल.
महेश्‍वर यादव, आमदार, राष्ट्रीय जनता दल

बिहार विधानसभा
२४३
एकूण सदस्य
८०

‘आरजेडी’चे सदस्य

२०१५च्या निवडणुकीत निवडून आलेला राष्ट्रीय जनता दल हा विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष होता.
 

संबंधित बातम्या