देशातील सर्वात मोठी प्लाझ्मा बँक लखनौत

पीटीआय
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

केजीएमयूचा दावा;  ८३० प्लाझ्माची संकलन क्षमता

लखनौ: राजधानी लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल यूनिर्व्हर्सिटी येथे प्लाझ्मा बँक कार्यान्वित झाली असून ही बँक देशातील सर्वात मोठी असल्याचा दावा केजीएमयू संस्थेने केला आहे. या प्लाझ्मा बँकेत ८३० यूनिट प्लाझ्मा सुरक्षित ठेवण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. केजीएमयूच्या शताब्दी भवन येथे ब्लड बँकेजवळ प्लाझ्मा बँकेची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत ४५ कोरोना योद्‌धा नागरिकांनी प्लाझ्मा दान केला असून २५ जणांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. 

केजीएमयू येथे कोरोनाबाधित रुग्णांवर पहिल्यांदा २७ एप्रिल रोजी प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली होती. हा रुग्ण ५८ वर्षीय डॉक्टर होता. त्यांना कॅनडा येथील महिला डॉक्टरचा प्लाझ्मा देण्यात आला होता. त्यांच्यावर केजीएमयूमध्ये उपचार सुरू होते. परंतु ९ मे रोजी हदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान, केजीएमयूच्या रक्तदान विभागाच्या अध्यक्षा डॉ. तुलिका चंद्रा म्हणाल्या की, केजीएमयूची प्लाझ्मा बँक ही देशातील सर्वात मोठी बँक असून तेथे ८३० प्लाझ्मा यूनिटचे संकलन करता येते. या बँकेत प्लाझ्मा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. 

अन्य राज्यातील प्लाझ्माची गरज देखील या बँकेच्या माध्यमातून भागवता येते. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांने प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे अन्य बाधित रुग्णांचा जीव वाचवता येतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर चौदा दिवसांनी प्लाझ्मा देता येतो, असेही चंद्रा म्हणाल्या. दरम्यान, रविवारी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्लाझ्मा बँकेचे उदघाटन केले. कोरोनाशी मुकाबला करुन बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

संबंधित बातम्या