हद्द झाली! लस चोरीनंतर चक्क लिक्विड ऑक्सिजनचा टँकर झाला गायब

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

हरयाणामधील पानिपतमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. देशात ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात मागणी वाढली आहे. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन ही मुळातच जिवंत राहण्यासाठी मूलभूत गरज असताना कोरोना काळात ऑक्सिजनचं मोल कैक पटींनी वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचीही चोरी  झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन वाहून नेणारा टॅंकरच गायब करण्यात आला आहे. हरयाणामध्ये (Haryana) हा प्रकार उघडकीस आला असून हरयाणा पोलिसांनी त्वरीत यासंबंधी गुन्हा दाखल करुन घेतला. (The limit has been reached The tanker of liquid oxygen disappeared after the vaccine was stolen)

हरयाणातील पानिपतमध्ये (Panipat) लिक्विड ऑक्सिजनचा(liquid oxygen)  प्लांट आहे. या प्लांटमधून राज्यातील इतर भागासंह इतर राज्यातही ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. पानिपतहून अशाच प्रकारे लिक्विड ऑक्सिजनचा टॅंकर बुधवारी हरयाणातील सिरसा या ठिकाणी जात होता. परंतु हा ऑक्सिजन वाहून नेणारा टॅंकर सिरसामध्ये पोहचलाच नाही, अशी तक्रार पानिपत जिल्हा औषध नियंत्रकांनी दिली आहे.

पैशाला हात न लावता चोरट्यांनी पळवली कोरोना लस

‘’बुधवारी प्लांटमधून लिक्विड ऑक्सिजन भरुन हा टॅंकर निघाला. सिरसामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होणार होता. परंतु हा टॅंकर त्याच्या नियोजित स्थळी पोहचलाच नाही. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु करण्यात आला आहे,’’ अशी माहिती पानिपतमधील मतलाऊडाचे स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी दिली आहे.

दरम्यान यापूर्वी असाच धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये (Delhi) देखील घडल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी हरयाणाचे मंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी केला होता. पानिपतहून कोरोना रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजन नेणारा एक टॅंकर लुटला होता, असा आरोप अनिल विज यांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठ्यावरुन हरयाणा सरकार आणि केजरीवाल सरकारमधील संबंध ताणले होते.
 

संबंधित बातम्या