लॉकडाउनमुळे वाहनउद्योग पंक्चर

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन याचा मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन याचा मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे.

यामुळे या क्षेत्राचे दररोज २ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून या क्षेत्रातील ३ लाख ४५ हजार लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. वाणिज्यविषयक संसदीय समितीने राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांच्याकडे या संदर्भातील अहवाल सादर केला असून त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. 

तेलंगण राष्ट्रसमितीचे खासदार एम.पी. केशवराव यांच्या अध्यक्षतेखालील वाणिज्यविषयक संसदीय स्थायी समितीने हा अहवाल तयार केला आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी म्हणून या समितीने सरकारला काही उपाययोजना देखील सुचविल्या आहेत. यासाठी जमीन आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जाव्यात असेही या समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. वाहनांच्या विक्रीमध्ये घसरण झाल्याने मूळ यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये १८ ते २० टक्क्यांनी कपात केली असल्याचे वाहन उद्योगातील संघटनांचे म्हणणे आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या  सर्वाधिक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचे हा अहवाल सांगतो.

मोठा परिणाम होणार
सध्या या क्षेत्रामध्ये नव्याने होणारी नोकरभरती पूर्णपणे थांबली आहे. २८६ बड्या ऑटो डिलर्संनी त्यांची आस्थापने बंद केली आहेत. वाहन उद्योगातील घसरणीचा नकारात्मक परिणाम हा वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर झाल्याचे हा अहवाल सांगतो.  या आर्थिक संकटाचे परिणाम पुढील दोन वर्षे जाणवणार आहेत. यामुळे उद्योगांना पूर्ण क्षमतेने काम करता येणार, भविष्यातील गुंतवणुकीचा ओघ देखील आटू शकतो, उद्योगांच्या दिवाळखोरीचे प्रमाण वाढेल, या उद्योगातील साखळीत विविध पातळ्यांवर कामगारांची कपात होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.

आणखी वाचा:

कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला - 

बालसंगोपन केंद्रामधील बालकांना तीस दिवसांच्या आत  निधी द्या -

संबंधित बातम्या