खेळ आणि तंदुरुस्ती दिनचर्येचा भाग बनवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑगस्ट 2020

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आजच्या राष्ट्रीय क्रीडादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, खेळ व तंदुरुस्ती ही प्रत्येक देशवासीयाने आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन केले आहे. 

नवी दिल्ली: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आजच्या राष्ट्रीय क्रीडादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, खेळ व तंदुरुस्ती ही प्रत्येक देशवासीयाने आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन केले आहे. 

क्रीडादिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांनीही शुभेच्छा दिल्या. कोरोना महामारीने देशवासीयांना शारीरिक मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटविले. त्यामुळे फीट इंडिया व योगाभ्यास यांना लोकचळवळ बनवावे, असे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. मोदी यांनी ट्‌विटमध्ये म्हटले, की खेळांना लोकप्रिय बनवण्यासाठी व प्रतिभावान खेळाडूंना पुढे आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येकानेच फिटनेसला मूलमंत्र मानले पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. मात्र असे केल्याने प्रत्येक जण आनंदी व आरोग्यदायी जीवन जगू शकतो. राष्ट्रीय क्रीडादिन हा मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. त्यांच्या हॉकी स्टीकची जादू कोणी विसरू शकणार नाही. आमच्या प्रतिभासंपन्न खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक व कुटुंबीयांचीही प्रशंसा करण्याचा आजचा दिवस आहे. ज्या खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करताना जागतिक स्पर्धांमध्ये यश मिळविले त्यांचे ते यश उत्साहात साजरे करण्याचा आजचा दिवस आहे.'

राज्याला ६ राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले. घोडेस्वार सुभेदार अजय सावंत, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू राहुल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खो-खोपटू सारिका काळे आणि टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर या ६ महाराष्ट्रीय खेळाडूंना २०२० साठीचे अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील १४ खेळाडू व संस्थांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहा अर्जुन, तीन ध्यानचंद, एक द्रोणाचार्य, एक तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी  पुरस्कार आणि तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांत समावेश आहे. 

ध्यानचंद यांना भारतरत्न द्या 
मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा जोरदारपणे समोर आली आहे. खासदार गौतम गंभीर यांनी ट्‌विटद्वारे ही मागणी केली. ध्यानचंद यांच्या उंचीचा व त्या तोडीचा क्रीडापटू आजतागायत देशात निर्माण झालेला नाही हेही सत्य त्यांनी सांगितले. २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद जिल्ह्यात जन्मलेले ध्यानचंद यांनी १९२८ , १९३२ व १९३६ या वर्षी भारताला हॉकीचे ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४००  पेक्षा जास्त गोल नोंदविले. भारत सरकारने १९५६ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले.

संबंधित बातम्या