'ममता बॅनर्जींचं सरकार भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचारात क्रमांक एकवर'

गोम्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचारात क्रमांक एकवर आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. राज्याच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी भाजपच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले.

वीरभूम : पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचारात क्रमांक एकवर आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. राज्याच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी भाजपच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले.

पश्‍चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापल्यामुळे आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे अमित शहा यांनी बंगालची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांनी संध्याकाळी वीरभूम येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. ममता यांना सत्तेचा अहंकार झाला असल्याने त्यांच्या काळात राज्यात हिंसाचार आणि भ्रष्टाचार वाढल्याची टीका शहा यांनी केली. ममता यांच्या काळात ज्यूट उद्योगासह अनेक उद्योग नष्ट झाले, बेरोजगारी वाढली, जनतेचे उत्पन्न कमी झाले, राजकीय गुन्हेगारी वाढली, असे दावे शहा यांनी केले. या सर्व गैरप्रकारात राज्य ‘नंबर वन’ झाले असल्याचे सांगत त्यांनी याबाबतची आकडेवारीही दिली आणि शंका असल्यास तृणमूलने खुली चर्चा करावी, असे आव्हानही दिले. ‘केंद्र सरकारने देशातील १० कोटी शेतकऱ्यांना एकूण ९५ हजार कोटी रुपयांचे वाटप केले. मात्र, ममता सरकारने यातील एक रुपयाही पश्‍चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मिळू दिला नाही,’ अशी टीका शहा यांनी केली. 

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शहा यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या अध्यक्षावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. सत्तेचा अहंकार झाला की अशी कृती होते, असे म्हणत शहा यांनी हल्ल्याला तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला. 

 

अमित शहा म्हणाले..

  •     सत्ता आल्यास पुन्हा ‘शोनार बांगला’
  •     राज्यात निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळतील
  •     राजकीय संघर्षांविरोधात चौकशीही नाही
  •     चक्रीवादळ निधी, कोरोना काळातील 
  •     निधी गरीबांपर्यंत पोहोचलाच नाही
  •     बंगालच्या विकासासाठी नरेंद्र मोदी हाच पर्याय
  •     बंगालचा मुख्यमंत्री बंगालीच असेल 
  •    विकासासाठी भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागत

"आमच्यावर कितीही हल्ले झाले तरी आम्ही आमच्या विकासाच्या मार्गावरून हटणार नाही. आम्ही थांबू, मागे हटू, या गैरसमजात कोणी राहू नये. हिंसेचे उत्तर लोकशाहीमार्गाने देऊ. पश्‍चिम बंगालला एक चांगले सरकार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

 

 

 

संबंधित बातम्या