पक्ष सोडून जाणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी दिला इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

पश्चिम बंगाल मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठीचे वारे सध्या जोमाने वाहू लागल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगाल मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठीचे वारे सध्या जोमाने वाहू लागल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज हूगली मध्ये आयोजित केलेल्या एका सभेत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका देखील केली आहे. याशिवाय मागील काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या पक्षातील अनेकजण भाजपा मध्ये सहभागी होत होते. या पार्श्वभूमीवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी, जे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे, बंगाल आणि टीएमसीला तुमची गरज नसल्याचे हुगळीतील पुरसुराच्या सभेत म्हटले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवताना, नेताजी सुभाषचंद्र बोस हे प्रत्येकाचे नेते असल्याचे म्हटले आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी म्हणजे 23 जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियल मधील कार्यक्रमात घडलेल्या संदर्भात बोलताना, ते पंतप्रधानांसमोर मला त्रास देत होते. मात्र आपला विश्वास बंदुकीवर नसून राजकारणावर असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सभेत म्हटले आहे. याशिवाय भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आणि बंगालचा अपमान केला असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळेस केला. 

त्यानंतर, वृद्ध महिला या 'हरे कृष्ण, हरे राम', असे म्हणतात. परंतु आपण 'हरे कृष्णा, हरे राम, बिदाई जाव भाजपा, वाम आणि 'हरे कृष्णा हरे हरे, तृणमूल घोर घोरे', असे म्हणत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पुढे म्हटले आहे. याव्यतिरिक्त पक्ष सोडून जाणाऱ्यांवर देखील ममता बॅनर्जी यांनी चांगलीच तोफ डागली आहे. पक्षाने त्यांना तिकीट दिले नसते म्हणून ते घाबरून दुसऱ्या पक्षात जात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी यावेळेस म्हटले आहे. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तृणमूल कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांचा नंदीग्राम हा गढ मानला जातो. सुवेंदू अधिकारी यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मध्ये मेगा रॅलीचे आयोजन करत, सुवेंदू अधिकारी यांना मोठा शह देण्याचा प्रयत्न केला होता. तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिवशी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मधील विक्टोरिया मेमोरियल मध्ये एक कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बनर्जी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. व यावेळेस ममता बॅनर्जी भाषणासाठी बोलायला सुरु झाल्यानंतर, उपस्थितांच्यातील कथित भाजप समर्थकांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा देण्यास सुरवात केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पारा चढून त्यांनी भाषण देण्यास नकार दिला होता. 

    

संबंधित बातम्या