ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय; पेट्रोल व डिझेलच्या किमतीत केली एक रुपयाची घट

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी आज याबाबतची माहिती देताना, आज रात्रीपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक रुपयांची घट करण्यात आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने हुगळी जिल्ह्यातील विविध ठिकाणी निदर्शने केली होती. त्यानंतर काल तृणमूल काँग्रेस पक्षाने बैद्यवाटी आणि शेवडाफुली भागात रॅली काढत इधंन दरवाढीविरोधात विरोध प्रदर्शन केले होते. इतकेच नाही तर श्रीरामपूर नवा गवा भागात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले कपडे काढून केंद्र सरकारच्या विरोधात अनोख्या मार्गाने घोषणाबाजी केली होती. 

ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीला सीबीआयची नोटीस

काल शनिवारी देशातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 37 पैशांची वाढ केली होती. त्यामुळे देशात सलग बाराव्या दिवशी     पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली. मागील 12 दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत 3.63 आणि डिझेलच्या किंमतीत 3.84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आणि त्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर यापूर्वीच 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 97 रुपये प्रतिलिटरच्या उच्चांकावर गेली आहे. आणि तेच डिझेल 88 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहचले आहे. तसेच राजधानी दिल्लीत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 90.58 रुपये आणि डिझेल 80.97 रुपये प्रति लिटर झाले आहेत. 

दरम्यान, 2017 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर काल झालेली वाढ ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर पडतो आहे. भारत तेलाची 85 टक्के गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. तसेच अमेरिकेतील ऊर्जा संकटामुळे या आठवड्यात ब्रेंट तेलाची किंमत 65 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचली आहे.

संबंधित बातम्या