नरेंद्र मोदींना देश चालवता येत नाही; ममतांनी डागली तोफ

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 मार्च 2021

नंदीग्राम मध्ये प्रचारादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी पुन्हा बाहेर पडल्या.

कोलकत्ता: नंदीग्राम मध्ये प्रचारादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी पुन्हा बाहेर पडल्या. आज पार पडलेल्या पुरुलिया रॅली मध्ये त्यांनी व्हील चेअरवर बसून सभांना संबोधित केले. ममता बॅनर्जी यांनी मंचावर व्हील चेअरवर येऊन त्यांनी भाजप विरोधात जोरदार टीका केली. यावेळेस ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मध्ये झालेल्या घटनेत आपण भगवंताच्या कृपेने वाचल्याचे सांगितले. तसेच काही लोकांना वाटले की आता आपण बाहेर पडू शकणार नाही किंवा बाहेर पडून मोर्चे काढू शकणार नाही. मात्र दुखापतग्रस्त असून देखील आपण गप्प राहणार नसल्याचे त्या म्हणाल्या. 

नंदीग्राम मध्ये झालेल्या घटनेनंतर देखील आपण थकणार नाही आणि थांबणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज जाहीर सभेत बोलताना सांगितले. शिवाय आपला आवाज कोणीही दडपू शकत नाही व मला लोकांमध्ये जावे लागेल, असे त्या म्हणाल्या. यानंतर लोकांच्या वेदना माझ्यापेक्षा जास्त आहेत. बंगालचे संरक्षण केले पाहिजे. बंगाल वाचवायचा असल्याचे म्हणत, पैशाच्या जोरावर भाजपने मते खरेदी केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. पुरुलिया येथे जाहीर सभा घेताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी दुखावले आहे पण बंगाल वाचवण्यासाठी मला बाहेर पडावे लागले.'' 

कृषी कायद्यानंतर केंद्राचा मोर्चा दिल्लीकडे; नव्या विधेयकावरून दिल्ली सरकार व...

याव्यतिरिक्त, पैशासाठी आपला विवेक विकू नये म्हणून जनतेला सावध करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच ममता बॅनर्जी यांनी आपल्या सरकारच्या कामगिरी यावेळी जनतेसमोर मोजल्या. तर, केंद्र सरकारने डिझेल, एलपीजी आणि केरोसिनच्या किंमती वाढवण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची टीका त्यांनी केली. यानंतर, महागाईवर या केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्या म्हणाल्या. 

ममता बॅनर्जी यांनी आपल्या सरकारने शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष दिले असल्याचे सांगितले. मुलींना पदवीनंतर 25000 रुपये देण्यात आले आहेत, बर्‍याच शाळा बांधल्या गेल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर भाजप सर्व केंद्रीय उपक्रमांची विक्री करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आरोप करत त्यांना देश चालवता येत नसल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. व आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपाशी लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. नंदीग्राममध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर झालडा येथे पहिल्या निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या ममता बॅनर्जी यांनी आदिवासी कुडामी कार्ड खेळले असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.  

संबंधित बातम्या