'शिवभोजन' थाळीच्या धर्तीवर ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगाल मध्ये ‘माँ किचन’

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज संपूर्ण राज्यभरात ‘माँ किचन’च्या योजनेला सुरवात केली आहे.

पश्चिम बंगाल मध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज संपूर्ण राज्यभरात ‘माँ किचन’च्या योजनेला सुरवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये फक्त पाच रुपयात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ममता बॅनर्जी यांनी या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उदघाटन केले. ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार गरजुंना फक्त पाच रुपयात जेवण मिळणार आहे. तर उर्वरित पंधरा रुपये अनुदान राज्य सरकार या ‘माँ किचन’ला देणार आहे.   

कोरोनाविरोधातील लढाईला वेग; गेल्या सात दिवसातील आकडेवारी काय सांगते पाहा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरु केलेल्या ‘माँ किचन’ या योजनेची सुरवात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली असून, सध्या काही शहरांमध्ये आणि गावात फक्त पाच रुपयांमध्ये गरजुंना जेवण मिळणार आहे. त्यानंतर यात पुन्हा वाढ करण्यात येणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी आज दिली. यावेळेस ममता बॅनर्जी यांनी लाभार्थ्यांना फक्त पाच रुपये द्यावे लागणार असल्याचे म्हटले असून, उर्वरित पंधरा रुपये अनुदान म्हणून राज्य सरकार या ‘माँ किचन’ला देणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच या योजनेमुळे राज्यात रोजगार देखील वाढणार असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. 

‘माँ किचन’च्या योजेननंतर ममता बॅनर्जी यांनी आज राज्यातील अनेक योजनांचे उदघाटन केले. त्यांनी सॉल्ट लेक येथील आयटी पार्कसह इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले ज्यामुळे राज्यात सुमारे दीडशे कोटींची गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तर यावर्षीच्या एप्रिल आणि मेमध्ये पश्चिम बंगालमधील 294 विधानसभा जागांसाठीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चालू केलेली ‘माँ किचन’ ही योजना महाराष्ट्रात सुरु असलेल्या 'शिवभोजन थाळी' प्रमाणेच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'शिवभोजन थाळी' सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुरवातीला  ही भोजन थाळी दहा रुपयात मिळत होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात याची किमंत पाच रुपये करण्यात आली होती. शिवाय तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी देखील राज्यात अशाच प्रकारची एक योजना चालू केली होती.      

संबंधित बातम्या