'पश्चिम बंगालच्या निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये फक्त ममताच राहतील' ; नऊ आमदार, एक खासदार भाजपमध्ये

गोम्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रसमध्ये असतानाचे दिवस आठवावेत. काँग्रेसला सोडूनच त्यांनी तृणमूलची स्थापना केली होती. तो दलबदलूपणा नव्हता का, आता तर सुरुवात झाली आहे, निवडणुकीपर्यंत ममता एकट्याच पक्षामध्ये राहतील, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल येथील सभेत बोलताना केली.

मिदनापूर :  भाजप दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना फोडतो असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करतात, पण त्यांनी काँग्रसमध्ये असतानाचे दिवस आठवावेत. काँग्रेसला सोडूनच त्यांनी तृणमूलची स्थापना केली होती. तो दलबदलूपणा नव्हता का, आता तर सुरुवात झाली आहे, निवडणुकीपर्यंत ममता एकट्याच पक्षामध्ये राहतील, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल येथील सभेत बोलताना केली. शहा यांच्या पश्‍चिम बंगाल दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ममतादीदींच्या गडाला मोठा धक्का बसला. शहांच्या उपस्थितीमध्ये अनेक बड्या नेत्यांनी आज कमळ हाती घेतले.

 

भाजपमध्ये आज प्रवेश करणाऱ्या लोकांचा प्रवास हा माँ, माटी आणि मानुष या तत्त्वांना अनुसरूनच सुरू झाला होता. ममतांनी मात्र त्याचे रूपांतर तुष्टीकरण, घराणेशाहीमध्ये केले. भाजपच्या तीनशे कार्यकर्त्यांना प. बंगालमध्ये प्राण गमवावे लागले आहेत. आम्ही आता झुकणार नाही. तृणमूल जितक्या आक्रमकपणे आमच्यावर हल्ला करेल तितक्याच आक्रमकपणे आम्ही विजयाच्या दिशेने आगेकूच करू, राज्यातील जनेतेने डाव्यांना २७ वर्षे दिली, तृणमूलने दहा वर्षे राज्य केले, आम्हाला एक संधी द्या. राज्याला सोनार बांगला करू असा विश्‍वास शहा यांनी 
व्यक्त केला.

"तृणमूल काँग्रेसमध्ये आता लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. आत्मसन्मानासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यातील स्थिती बिघडली असून तिच्यात सुधारणा करण्यासाठी राज्याची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवायला हवीत."
- सुवेंदू अधिकारी, 
तृणमूलचे बंडखोर नेते

नऊ आमदार, एक खासदार भाजपमध्ये

तृणमूलचे बडे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत नऊ आमदार आणि एका खासदाराने आज भाजपमध्ये प्रवेश केला. वर्धमान पुरबा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे सुनील मोंडल यांनी कमळ हाती घेतले. आमदार बनसारी मैती, शीलभद्र दत्त, विश्‍वजित कुंडू, सुकरा मुंडा आणि सैकत पनजा यांनीही प्रवेश केला. दिपाली विश्‍वास, हल्दियाचे माकपच्या आमदार तापसी मंडल, तामलूकचे अशोक डिंडा,  पुरूलियाचे काँग्रेसचे आमदार सुदीप मुखर्जी, माजी खासदार दसरथ तिक्री यांनी प्रवेश केला.

 

विवेकानंदांच्या जन्मस्थळाला भेट

कोलकता : गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. स्वामीजींचे विचार आज देखील तितकेच कालसुसंगत असल्याचे  ते म्हणाले. भारतीय संस्कृती, दृष्टी आणि मूल्ये यांचा जगभर प्रसार करण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचा मोठा वाटा आहे. आज या स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांचे विचार  किती कालसुसंगत आहेत याची प्रचिती येते असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वामीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहा यांनी त्यांनी वापरलेल्या वस्तूंची पाहणी करत साधूंशी संवाद साधला.

 

संबंधित बातम्या