संपत्तीच्या वादातून मध्यप्रदेशमध्ये हत्याकांड

PTI
शुक्रवार, 17 जुलै 2020

एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या ; आरोपीचा मारहाणीत मृत्यू

भोपाळ

मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्याच्या कुटुंबातील सहा जणांची तलवारीने हत्या केल्याची खळबळजनक घटना आज घडली. ही घटना मंडला जिल्ह्यातील बिजाडंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनेरी चौकी येथे घडली. संपत्तीच्या वादातून घडलेल्या प्रकरणाने मध्य प्रदेश हादरले असून या घटनेने संतापलेल्या गावकऱ्यांनी दोनपैकी एका आरोपीला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
राजेंद्र सोनी हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. ते व्यापारी होते. त्यांच्यावर दुकानातच हल्ला झाला आणि ते जागीच ठार झाले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची तलवारीने हत्या करण्यात आली. मृतात राजेंद्र सोनी (वय ५८), त्यांचे भाऊ विनोद सोनी (वय ४५), पुतण्या ओम सोनी (वय ९), पुतणी प्रियांशी सोनी (वय ७), मुलगी प्रिया सोनी (वय २८), व्याही दिनेश सोनी (वय ५०) यांचा समावेश आहे. या हत्याकांडातील आरोपीत संतोष सोनी (वय ३५) याचा मारहाणीत मृत्यू झाला तर अन्य आरोपी हरी सोनी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. हत्येचा संशय त्यांचेच नातेवाईक संतोष सोनी आणि हरी सोनीवर आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपींना पकडून ठेवले होते. घटनास्थळी पोलिसांना येण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलिस येईपर्यंत संतोष सोनीला बेदम मारहाण झाली होती आणि त्याचा मृत्यू झाला. दुसरा आरोपी हरी सोनी पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारली आणि पकडले. सोनी कुटुंबात संपत्तीचा वाद होता आणि त्यातूनच हत्यांकाड घडले, असे पोलिसांनी सांगितले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या