सिंघू सीमेचा आरोग्याला आधार

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या ठिकाणाजवळील खेड्यातून अनेकजण आंदोलन स्थळी विनामूल्य वैद्यकीय सल्ल्यासाठी येत आहेत. शेतकऱ्यांबरोबर त्यांच्यावरही उपचार केले जात आहेत.

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे प्रसिध्द्‌ झालेल्या सिंघू सीमेवर बबली ही महिला आपल्या दोन मुलांसह आली. आपल्या आठ व बारा वर्षांच्या मुलांसाठी ती वैद्यकीय मदतकेंद्रात डॉक्टरला शोधत होती. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या ठिकाणाजवळील खेड्यातून अनेकजण आंदोलन स्थळी विनामूल्य वैद्यकीय सल्ल्यासाठी येत आहेत. शेतकऱ्यांबरोबर त्यांच्यावरही उपचार केले जात आहेत.

डॉक्टरांनी आम्हाला काही गोळ्या व खोकल्याचे औषध दिले. त्याचप्रमाणे, त्यांनी माझ्या छोट्या मुलीची चाचणी करून लोह व कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या, असे बबिता सांगते. अलीपूरमधील भीमसिंग हेही महागडे उपचार परवडत नसल्याने आपल्या वडिलांच्या गुडघेदुखीवर सल्ला घेण्यासाठी आले होते. 

सोशल अपलिफ्ट मूव्हमेंटचे डॉ. देविंदर कौर यांच्या पथकाला उच्च रक्तदाब, हदयविकार आदी गंभीर समस्या असलेले रूग्णही आढळले. सर्व वैद्यकीय केंद्रात रक्तदाब मोजणारे मशीन, नेब्युलायझर, रक्तातील साखर मोजणाऱ्या किट्‌स आहेत. सुमारे ४० टक्के रुग्ण सिंघू सीमेजवळील कोंडली, अलीपूर, सिंघोला या गावातील आहेत.

सिंघू सीमेवर दिवसाची २४ तास वैद्यकीय केंद्रे सुरू आहेत. त्यात डॉक्टरांसह परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारीही आहेत. दररोज जवळपास २०० जणांची तपासणी केली जाते. यातील ३० टक्के गरीब लोक शेजारच्या खेड्यांतील आहेत. बहुतेक लोकांना सर्दी, खोकला, पोटदुखी, अशक्तपणाचा त्रास आहे. 
- डॉ. अंशुमन मित्र, मेडिकल सर्व्हिस सेंटर, कोलकाता

संबंधित बातम्या