‘एमसीआय’च्या निर्णयाने परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय

वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

परदेशी विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात ऑनलाइन शिक्षण घेण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया- एमसीआय)मज्जाव केला आहे. 

सोमेश्वरनगर :  परदेशी विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात ऑनलाइन शिक्षण घेण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया- एमसीआय)मज्जाव केला आहे. या एका निर्णयाने माझी मुलगी फिलिपिन्सला अडकली आहे. त्यातूनही भारतात आलीच तर फिलिपिन्स सरकारने कोरोनाच्या प्रसारामुळे पुन्हा प्रवेशास बंदी केली आहे. ‘एमसीआय’च्या अन्यायकारक निर्णयाने वर्ष वाया जाईल, पैसे बुडतील आणि मुलेही परदेशात एकटी पडलीत... अशी व्यथा मकरंद देशपांडे यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. 

महाराष्ट्रासह भारतातून काही लाख मुले रशिया, चीन, कझाकिस्तान, फिलिपिन्स अशा विविध देशांत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे काही मुले मायदेशी परतली तर काही ऑनलाइन शिक्षणासाठी परदेशात अडकून पडली आहेत. ‘एमसीआय’ने या मुलांना भारतातून ऑनलाइन शिक्षण घेण्यास मनाई केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष आणि पैसाही वाया जाण्याचा धोका आहे. ‘एमसीआय’ने देशांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयांना ऑनलाइन शिक्षण व परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. तसेच कोरोना संपून महाविद्यालये सुरू होताच प्रात्यक्षिके, प्रशिक्षण या गोष्टी सक्तीने पूर्ण करण्याचा आदेशही काढला आहे. के. व्ही. पद्मनाभन यांनी माहिती अधिकारात‘एमसीआय’ला परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांबाबत विचारणा केली होती.

 

"मुलगा दहा महिने झाले फिलिपाईन्समध्ये अडकून पडला आहे. महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण तो इथे कुटुंबात राहून सुरक्षितपणे घेऊ शकला असता. आमचा खर्चही वाचला असता. पण ‘एमसीए’च्या निर्णयाने त्याला इकडे येता येईना आणि समजा आलाच तर परत जाता येईना अशी अवस्था आहे."
- डॉ. मनोहर व डॉ. मनीषा कदम, मुरूम (ता. बारामती)

 

"खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने मुलगी रशियातून भारतात येऊ शकली. आता तिचे ऑनलाइन शिक्षण नियमित सुरू आहे. पण ‘एमसीए’ने असा निर्णय घेतला तर प्रश्‍न निर्माण होणार आहे."
- नवेंदू शहा, नीरा, (ता. पुरंदर)

संबंधित बातम्या