पुढील पाच वर्षांत २५ शहरांत मेट्रोसेवा : मोदी

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

देशात २०१४ मध्ये केवळ सात शहरांत मेट्रोसेवा होती. आज ही संख्या अठरापर्यंत गेली आहे व २०२५ पर्यंत देशाच्या २५ शहरांत मेट्रो धावेल,

नवी दिल्ली: देशात २०१४ मध्ये केवळ सात शहरांत मेट्रोसेवा होती. आज ही संख्या अठरापर्यंत गेली आहे व २०२५ पर्यंत देशाच्या २५ शहरांत मेट्रो धावेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. एक देश, एक कररचना,  एक देश, एक रेशन कार्ड, एक देश, एक फास्टॅग यासह नव्या कृषी सुधारणा व ई-नाम सारख्या सुविधांमुळे देशाची वेगाने प्रगती होत आहे. सध्या  ‘एक देश- एक कृषी बाजार’ या दिशेने आपली वाटचाल सुरू असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा कृषी कायद्यांचे समर्थन केले.

दिल्लीच्या मॅजेंटा लाईनवरील चालकरहित मेट्रोचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, 
‘डीएमआरसी’चे अध्यक्ष मंगू सिंह आदी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी नव्या एअरपोर्ट मेट्रोवरील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेचाही प्रारंभ केला. 

चालकरहित मेट्रो सुरू होणे हे देश विकासाच्या मार्गावर किती वेगाने अग्रेसर आहे, याचे एक प्रतीक आहे असे सांगून मोदी म्हणाले की दिल्ली मेट्रोची जगभरात चर्चा होते. पण ही सेवा सुरू करण्यास दिवंगत अटलजींचे प्रयत्नच कारणीभूत होते. २०१४ मध्ये देशात केवळ २४८ किमी मेट्रोचे जाळे होते. सध्या ते ७०० किलोमीटरपर्यंत वाढले आहे व २०२५ पर्यंत देशात १७०० किलोमीटरचे अंतर मेट्रोसेवा कव्हर करतील असे प्रयत्न आहेत. भारतातच डब्यांची निर्मिती सुरू केल्यावर त्यांची किंमत प्रत्येकी १२ कोटींवरून ८ कोटींपर्यंत कमी झाली. 

संबंधित बातम्या