स्थलांतरित मजुरांमुळे यूपी, बिहारमध्ये कोरोना

Dainik Gomantak
रविवार, 14 जून 2020

श्रमिकांमुळे देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरले

मुंबई

लॉकडाऊनमुळे लाखो श्रमिक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांत फसले होते; मात्र यातील बहुतांश श्रमिक आपापल्या राज्यात परतले आहेत; मात्र या श्रमिकांमुळे या राज्यांत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. एकट्या बिहार, उत्तर प्रदेशमध्ये 75 टक्के कोरोनाबाधित प्रकरणे ही श्रमिक किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहेत; तर राजस्थान, पश्‍चिम बंगाल, ओडिशा या राज्यांत ग्रामीण भागात कोरोना पसरला आहे.
देशात पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्ग मुख्यतः घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मर्यादित होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच मे महिन्यानंतर दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसारख्या राज्यांतून श्रमिक घरी परतायला लागले आणि कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरले.

बिहार कोरोना रुग्णसंख्या- 6103
श्रमिक विशेष रेल्वेने 20 लाख श्रमिक बिहारमध्ये परतले. सुरुवातीला एप्रिल महिन्यात बिहारमध्ये केवळ 24 कोरोनाबाधित होते; मात्र पहिल्या टप्प्यात तीन हजार श्रमिक राज्यात दाखल होताच कोरोनाबाधितांची संख्या 450 पर्यंत पोहोचली. आता राज्यातील सहा हजारांवर रुग्ण गेलेत. महत्त्वाचे म्हणजे बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना पसरला आहे. एकूण रुग्णांपैकी स्थलांतरित श्रमिक किंवा त्यांच्या नातेवाईकांची संख्या 70 टक्के आहे.

उत्तर प्रदेश  कोरोना रुग्णसंख्या- 12,616
उत्तर प्रदेशमध्ये 30 लाख स्थलांतरित मजुरांची घरवापसी झाली. आता अमेठी, बस्तीसारख्या जिल्ह्यातही कोरोना ऍक्‍टिव्ह रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत 3460 श्रमिक कोरोनाबाधित झाले आहेत. राज्यातील 12 हजार रुग्णांपैकी 70 टक्के प्रकरणे श्रमिक आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहेत.

राजस्थान कोरोना रुग्णसंख्या- 12,068
राजस्थानमध्ये श्रमिक परतले आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पसरला. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमधील 30 टक्के रुग्ण आता ग्रामीण भागातले आहेत. डुंगरपूर, जालोर, जोधपूर, नागौरसारख्या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

ओडिशा कोरोना रुग्णसंख्या- 3,498
ओडिशामध्ये जवळपास पाच लाख श्रमिक घरी परतले. त्यानंतर राज्यातील बहुतांश म्हणजे 80 टक्के कोरोना रुग्ण ग्रामीण भागात सापडले आहेत. एकही कोरोनाबाधित नसलेल्या काही जिल्ह्यांत आता 500 रुग्ण झाले आहेत.

पश्‍चिम बंगाल कोरोना रुग्णसंख्या- 10,244
पश्‍चिम बंगालमध्ये सहा लाख श्रमिक परतले. 2 जूनपर्यंत राज्यात 4,049 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अगदी मालदा, कूचबिहार, हुगळीसारख्या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रमिकांची संख्या आहे.
 

संबंधित बातम्या