कोविड-19 विरोधातील प्रतिबंधक उपायांचा मंत्रिगटाकडून आढावा

Pib
बुधवार, 10 जून 2020

केंद्रीय आरोग्यसचिव श्रीमती प्रीती सुदान, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी श्री.राजेश भूषण, आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती आरती आहुजा आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ.रमण गंगाखेडकर यांनी या बैठकीत विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिगटाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

नवी दिल्ली,
कोविड-19 वरील उच्चस्तरीय मंत्रिगटाची सोळावी बैठक, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री.हरदीप सिंग पुरी, गृहराज्यमंत्री श्री.नित्यानंद राय, जहाजबांधणी तसेच रसायने व उर्वरक मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.मनसुखलाल मांडवीय आणि आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.अश्विनीकुमार चौबे यांच्यासह संरक्षणप्रमुख श्री.बिपीन रावत यांनीही या बैठकीत भाग घेतला. सार्वजनिक ठिकाणी राखण्याच्या उचित शारीरिक अंतराचे नियम पाळून हे सदस्य सहभागी झाले.

देशातील कोविड-19 बाबतची सद्यस्थिती, उपाययोजना, आणि या आजारासंबंधीचे व्यवस्थापन याविषयी मंत्रिगटाला यावेळी माहिती देण्यात आली. लॉकडाउन शिथिल करण्याच्या टप्प्याच्या अनुषंगाने अन्य देशांतील स्थितीच्या तुलनेत भारताची परिस्थिती कशी आहे याची झलक मंत्रिगटासमोर सादर करण्यात आली. तसेच, देशव्यापी लॉकडाउनची उपयोगिता अधोरेखित करून आजाराच्या व्यवस्थापनासाठी त्याचा लाभ उठविण्यासंबंधीही मुद्दे मांडण्यात आले. 11 सक्षम गटांना नेमून दिलेल्या कामांच्या प्रगतीविषयीही मंत्रिगटाला थोडक्यात माहिती दिली गेली. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने आखून दिलेल्या प्रमाणित कार्यान्वयन प्रणालीमुळे, कोरोना प्रतिबंधात्मक उपयांशी तडजोड ना करता, सार्वजनिक आणि निम-सार्वजनिक ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करण्यास कसकशी चालना मिळत जाईल, याबद्दलही मंत्रिगटाला माहिती देण्यात आली.

"लॉकडाउन उघडण्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करताना, निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत मात्र आता आपणांस कोविड-समुचित वागणूक आणखी शिस्तीने अंगी बाणवली पाहिजे", असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ.हर्ष वर्धन यांनी केले. "सर्वांनी शारीरिक अंतराचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, हातांच्या स्वच्छतेबाबत दक्ष राहणे, व श्वसनविषयक शिष्टाचारांचे पालन करणे- याची खबरदारी घेतली पाहिजे"- असेही ते म्हणाले. आत्मसंतुष्ट होण्यास सध्या अजिबात वाव नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आता सर्व सरकारी कार्यालय सुरु होत आहेत. तेव्हा शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्कचा वापर याबद्दल काटेकोर राहत, 'कोरोनावरील सामाजिक लसीचा' विसर पडू न देण्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कोरोनाच्या व्यवस्थापनात मदत करणारे आरोग्यसेतू ऍप डाउनलोड करून घेण्याचीही त्यांनी सर्वांना आठवण केली. आतापर्यंत 12.55 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हे ऍप डाउनलोड करून घेतले आहे.

देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची माहिती मंत्रिगटाला देण्यात आली. कोविडचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणेला बळकटी दिली जात आहे. दि. 9 जून 2020 रोजी देशात 958 कोविड समर्पित रुग्णालये असून विलगीकरणासाठी 1,67,883 खाटा, अतिदक्षता सेवेसाठी 21,614 खाटा आणि ऑक्सिजन सुविधेने युक्त अशा 73,469 खाटा उपलब्ध आहेत. कोविड समर्पित आरोग्यकेंद्रांची संख्या 2,313 इतकी आहे. तेथे विलगीकरणासाठी 1,33,037 खाटा, अतिदक्षता सेवेसाठी 10,748 खाटा आणि ऑक्सिजन सुविधेने युक्त अशा 46,635 खाटा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याखेरीज 7,525 कोविड काळजी केंद्रांमध्ये 7,10,642 खाटाही उपलब्ध आहेत. कोविड खाटांसाठी उपलब्ध असणाऱ्या व्हेंटीलेटर्सची संख्या 21,494 इतकी आहे.

केंद्र सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना/ केंद्रीय संस्थांना N95 प्रकारचे 128.48 लाख मास्क आणि 104.74 लाख PPE म्हणजे व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे पुरविली आहेत. तसेच केंद्र सरकारने 60,848 व्हेंटीलेटर्सचीही खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची चाचणी क्षमताही वाढली आहे.  553 शासकीय आणि 231 खासगी अशा एकूण 784 प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या चोवीस तासात 1,41,682 नमुने तपासले गेले आहेत.

लॉकडाउनचा ताण हलका करत अतिमहत्त्वाच्या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सक्षम गट-5 ने अंमलात आणलेल्या महत्त्वपूर्ण रणनीतीविषयीचे सादरीकरण या गटाचे अध्यक्ष श्री.परमेश्वरन अय्यर यांनी केले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ.रमण गंगाखेडकर यांनी चाचणी प्रयोगशाळांच्या सद्यस्थितीचे तपशील, देशातील तपासणी-क्षमतेत वाढ याविषयी सादरीकरण केले. तसेच, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, राम्डेसिवीर आणि अन्य मुद्द्यांवर माहिती दिली.

आतापर्यंत 1,29,214 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासांत 4,785 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे कोरोनामुक्तीचा एकूण दर 48.47% पर्यंत पोहोचला आहे. सध्या 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

 

संबंधित बातम्या