आरोग्य विभागाकडून पहिल्या दिवशीच्या लसीकरणाची आकडेवारी जाहीर 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

कोरोना विरुद्धच्या लढ्यातील आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना साथीच्या विरूद्ध जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन केले. यामध्ये कोरोना विरुद्धच्या लढ्यातील आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आरोग्य विभागाने सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे. 

देशातील लसीकरणाची मोहीम सुरु केल्यानंतर पहिल्या दिवशी लस दिलेल्या कोणालाही साईड इफेक्टसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत देशभरातील 1,65,714 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.  

तसेच लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील 3351 लस केंद्रांवर लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. व यावेळेस कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी देण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. याशिवाय कोविशील्ड या लसींचा पुरवठा सर्व राज्यांमध्ये करण्यात आला असून, फक्त 12 राज्यांमध्ये कोवॅक्सिन देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.   

 

संबंधित बातम्या