जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तिकीटाच्या पैशाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तिकीटातून जमा झालेले पैसे संबंधित खात्यात वेळेत जमा न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला.

अहमदाबाद : जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तिकीटातून जमा झालेले पैसे संबंधित खात्यात वेळेत जमा न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ही रक्कम  सुमारे ५.२४ कोटी असून याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आज रक्कम खात्यावर जमा झाल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नाही. 

ऑक्टोबर २०१८ रोजी नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. गेल्या वर्षभरात या ठिकाणी हजारो नागरिकांनी भेट दिली. याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीटातून दीड वर्षात ५,२४,७७,३७५ रुपयाचा निधी गोळा झाला. हा निधी स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या खात्यावर जमा करण्याचे कंत्राट बडोदा येथील एका खासगी बँकेला दिले आहे.

पोलिस उपअधीक्षक वाणी दूधत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे गोळा करणाऱ्या कंपनीने आणि काही कर्मचाऱ्यांनी हे पैसे खात्यात वेळेत जमा केले नाही. मात्र आज स्टॅच्यू ऑफ यूनिटी प्राधिकरणाने खात्यात ५.२४ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा या प्रकरणात सहभाग नाही. ही बाब बँक आणि रोकड जमा करणाऱ्या कंपनीदरम्यानची आहे. संबंधित संस्थेने आमचे पैसे जमा केले आहेत. ऑडिटमध्ये मिळालेली रक्कम आणि जमा झालेली रक्कम यात मेळ बसत नव्हता. 
 

संबंधित बातम्या