किमान २५ खासदार कोरोनाच्या विळख्यात; बाधितांची संख्या ५० वर जाण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभीच दोन्ही सभागृहांचे किमान पंचवीस खासदार कोरोनाबाधित झाल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले.

नवी दिल्ली: आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभीच दोन्ही सभागृहांचे किमान पंचवीस खासदार कोरोनाबाधित झाल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आरोग्याचा प्रश्‍न नव्याने चर्चेत आला आहे. जगभरातील बहुतांश देशांप्रमाणेच भारतामध्येही लोकप्रतिनिधींच्या आरोग्याची माहिती सार्वजनिक पातळीवर उपलब्ध नसते. 

कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये लोकसभेचे १७  व राज्यसभेचे सुमारे ८ खासदार आहेत. यात महाराष्ट्रातील प्रतापराव पाटील (चिखलीकर) व प्रतापराव जाधव यांचाही समावेश असल्याचे ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गेल्या शुक्रवारपासून (ता.११) तीन दिवस खासदारांसह संसद भवन परिसरात वावर असणाऱ्या सर्वांच्या कोरोनासाठी ‘आरटी पीसीआर’ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. 

लोकसभा उपाध्यक्ष तालिकेवरील मीनाक्षी लेखी, माजी मंत्री सत्यपालसिंह तसेच वरिष्ठ नेते सुखबीरसिंग यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अलीकडेच भाजपमध्ये आलेले राज्यसभा सदस्य दीपेंद्र हुड्डा यांनाही कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाबाधित खासदारांची संख्या ५० पर्यंत वाढेल, असा अंदाज वेगवेगळ्या स्तरांवर व्यक्त होत आहे. 

अशी चालणार संसद... 

  • सलग १६ दिवसांच्या अधिवेशनात रोज प्रत्येकी चार तासांच्या १८ बैठका 
  • परिसरात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी अत्यावश्‍यक 
  • संसद भवनाच्या परिसरात ४० ठिकाणी टचलेस सॅनिटायझर यंत्रे 
  • आपत्कालीन वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आदी सज्जता 
  • केंद्रीय मंत्री, खासदार, थेट सभागृहांशी संबंध येणारे सचिवालय कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पत्रकार, कॅमेरामन आदींना कोरोना चाचणी अनिवार्य 
  • आयसीएमआरकडून मोबाईलवर आलेला कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखविल्याशिवाय संसद परिसरातही प्रवेश नाही
  •  

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या