चीन सीमेवर भारताच्या ‘माऊंटेन फोर्सेस’ तैनात

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

ड्रॅगनच्या घुसखोरीवर बारीक लक्ष

नवी दिल्ली

चीनला लागून असणाऱ्या ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवरील घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने अतिउंच प्रदेशात गस्त घालण्यास सक्षम असणाऱ्या लष्करी तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्‍चिम, मध्य आणि पूर्व सेक्टरमधील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून होणाऱ्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्याचे काम या तुकड्या करतील. मागील दशकभरापासून लष्कराच्या या तुकड्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, त्यांना आता तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिउंचावर शत्रूशी दोन हात करण्याचे सामर्थ्य या तुकड्यांकडे असून कारगिल युद्धामध्ये त्यांची गोरिला युद्धनीती विशेष प्रभावी ठरली होती. सर्वांत उंच ठिकाणावर शत्रूशी दोन हात करणे हे मोठे कौशल्याचे काम असते, कारण तुमचा शत्रू वर बसलेला असतो आणि तो तुम्हाला कधीही टिपू शकतो. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये या तुकड्या तैनात केल्या जातात. उंचावर युद्ध करताना तुमच्याकडे लक्ष्याचा अचूक भेद घेण्याचे सामर्थ्य हवे, असे एका माजी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

महाकठीण काम
चीनच्या बाजूला असलेला तिबेटचा भूभाग हा काहीसा सपाट आहे, या ठिकाणी भारताची बाजूचा विस्तार हा काराकोरम पर्वतरांगांमधील के-टू शिखर ते उत्तराखंडमधील नंदादेवी आणि सिक्कीममधील कांचनजुंगा ते अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवरील नामचे बारवापर्यंत आहे. या पर्वतशिखरांमध्ये भूभाग जिंकणे आणि तो टिकवून ठेवणे हे महाकठीण असते असे लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 

संबंधित बातम्या