शिवराज सिंह चौहानांनी आपल्या पत्नीच्या नावाने चोरली कविता; लोक म्हणाले, 'आमदार चोरणाऱ्यांसाठी कविता चोरणे काय विशेष'

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत आपल्या पत्नीने ही कविता लिहिली असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, ट्विटरवर भोपाळच्याच भूमिका बिरथरे नावाच्या एका महिलेने ही कविता आपली असल्याचा दावा केला आहे. 

भोपाळ-  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर २२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री चौहान यांनी आपल्या ट्विटरवर एक कविता पोस्ट केली होती. जी  त्यांची पत्नी साधना सिंह यांनी लिहिली असल्याचे त्यांनी म्हटले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत आपल्या पत्नीने ही कविता लिहिली असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, ट्विटरवर भोपाळच्याच भूमिका बिरथरे नावाच्या एका महिलेने ही कविता आपली असल्याचा दावा केला आहे. या कवितेला आपले नाव न देता चौहान यांनी थेट त्यांच्या पत्नीचेच नाव दिले, असा आरोप या महिलेने केला आहे.   

शिवराज यांनी ट्विट केले होते की, 'माझ्या पत्नीने स्वर्गीय बाबूजींचे पुण्यस्मरण आणि जीवनाला काही पक्तींमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.''ज्यांच्या खांद्यावर बसून फिरत होती, आज त्यांनाच खांदा देऊन आली आहे. त्यांच्या डोक्याचे चुंबन घेत त्यांचा उपदेश घेऊन आली आहे".' यानंतर या पोस्टवर रिट्विट करत भूमिका बिरथरे यांनी ही कविता तुमच्या धर्मपत्नीने नव्हे तर मी लिहिली असल्याचा दावा केला. 

त्यांच्या या दाव्यानंतर ट्विटरवर मुख्यमंत्री चौहान यांना चांगंलंच ट्रोल व्हावं लागलं. यावर भूपेंद्र यादव नामक एका युजरने लिहिलंय,'या कवितेची मूळ लेखिका दुसरी आहे. आपण त्या लेखिकेचा पत्ता काढून तिची माफी मागावी.' अनुभव सिंह नावाच्या एकाने म्हटलंय,'आमदार चोरणारे आता कविताही चोरायला लागले आहेत.' 

दरम्यान, भूमिका बिरथरे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, ही कविता त्यांची आहे. आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर ती कविता लिहिली होती.'मी तेच लिहिलं ज्याचा मी अनुभव घेतला. कारण आपल्या वडिलांच्या अंतिम यात्रेत दरम्यान सर्व क्रियाकर्म मीच केले होते. मी आयफोनच्या नोटपॅडचा वापर करते. त्यामुळे कविता लिहिल्याची तारीख आणि दिनांक त्यात नमुद आहे.' 

पुढे बोलताना भूमिका यांनी सांगितले की,'मला माहिती पडले की मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही कविता त्यांच्या पत्नीने लिहिली असल्याचे म्हटले आहे. मला यावरच मोठा आक्षेप आहे. तुम्ही माझे आवडते मुख्यमंत्री आहात. मला या गोष्टीचे राजकारण करायचे नाही. मात्र, फक्त माझ्या कवितेचे क्रेडिट मला देण्यात यावे.'
 

संबंधित बातम्या