मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

अवित बगळे
बुधवार, 22 जुलै 2020

टंडन हे वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच शाखेत जात असत. संघात असतानाच त्यांची भेट अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी झाली. वाजपेयी यांनी लखनौ मतदारसंघ सोडल्यावर ही जागा त्यांचे वारसदार म्हणून लालजी टंडन यांना देण्यात आली.

भोपाळ

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रुग्णालयात निधन झाले. टंडन यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि ताप आल्याने त्यांना ११ जून रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टंडन यांचा प्रकृती खालावल्याचे रुग्णालयाने काल सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. टंडन यांची कोरोना चाचणी निगोटिव्ह आली होती. यकृतात गुंतागुंत झाल्याने १४ जून रोजी त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपावला होता.
टंडन हे वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच शाखेत जात असत. संघात असतानाच त्यांची भेट अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी झाली. वाजपेयी यांनी लखनौ मतदारसंघ सोडल्यावर ही जागा त्यांचे वारसदार म्हणून लालजी टंडन यांना देण्यात आली. २००९ मध्ये त्यांनी येथून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याआधी त्यांचा राजकीय प्रवास १९६०मध्ये सुरू झाला होता. ते दोन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा विधान परिषदेचे आमदार होते. त्यानंतर सलग तीनदा ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंह यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

कायद्याचे जाणकार ः मोदी
लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. ‘‘लालजी टंडन हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे कायम स्मरणात राहतील. उत्तर प्रदेशात भाजप बळकट करण्यात त्यांची महत्त्वाचा भूमिका होती. ते कुशल प्रशासक होते. त्यांना कायद्यांची चांगली माहिती होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निकट ते दीर्घकाळ होते, अशा शब्दांत मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्‍हणाले की, राजकारणात टंडन यांचे कार्य मोठे होते. लखनौमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातही ते सक्रीय होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही टंडन यांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या